महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची जोरदार तयारी पक्षाकडून सुरू आहे. १ मे रोजी ही सभा होणार असून सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. पण सभा निर्धारित ठिकाणी तारखेला आणि वेळेलाच होणार असल्याचा ठाम पवित्रा मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तशी जंगी तयारी करण्यासही मनसेनं सुरुवात केली आहे. त्यात आता थेट अयोध्येतून हिंदुत्ववादी संघटनांचे अडीच हजार कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेसाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अयोध्येतील हिंदुत्वावादी संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला पाठिंबा दर्शवला आहे. या संघटनांचे जवळपास अडीच हजार कार्यकर्ते औरंगाबादमध्ये राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी येणार असल्याची माहिती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. सभेची पूर्णपणे तयारी आम्ही करणार आहोत. स्टेजचं काम दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.
दरम्यान, मनसेच्या सभेला विरोध करत भीम आर्मीनं सभा उथवलून लावू असं थेट आव्हान दिलं आहे. यावरही मनसे नेत्यांनी कडक इशारा देत मनसेच्या सभेला विरोध करणं हे ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही. ही मनसेची सभा आहे त्यांनी विरोध करू नये असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खामकर यांनी भीम आर्मीला दिला आहे.
राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात आज बैठकऔरंगाबाद शहरातील कलश मंगल कार्यालयात आज मनसे नेत्यांची एक महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीला मनसेचे जवळपास ४०० पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. राज ठाकरेंच्या सभे संदर्भातील नियोजन या बैठकीत केलं जाणार आहे.
राज ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी पक्षाकडून करण्यात येत आहे. यासाठी गल्लीबोळात सायकलवरुन सभेचा प्रचार करण्यात येत आहे. या प्रचार सायकल देखील सभेच्या मैदानात सध्या दाखल झाल्या आहेत. सभेसाठी औरंगाबाद पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी पाच डीसीपींची नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे.