ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १५ : काळा पैसा रोखण्यासाठी जुन्या नोटांवर बंदी घालून दोन हजारची नवीन नोट चलनात आणण्याचा मोदी सरकारचा निर्णय भ्रष्टाचारी आणिं काळा पैसा जमविणा-यांचा सोयीचा ठरत असल्याची टीका प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. लाचखोरांसाठी दोन हजाराची नोट अधिक सोयीची ठरत असल्याचे कोल्हापूर येथील प्रकरणातून स्पष्ट झाल्याचा दावा सावंत यांनी केला.
कोल्हापूर येथे एका मुख्याध्यापकाच्या नियुक्तीला मान्यता देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा वरिष्ठ सहायक चंद्र्रकांत सावर्डेकरला ३५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. सावर्डेकरकडून दोन हजार रूपयांच्या १७ नोटा जप्त करण्यात आल्या. पाचशे आणि हजारची नोट बंद झाल्याने सावर्डेकरने लाच म्हणून दोन हजारांच्या नोटांची मागणी केली होती. एकीकडे आपल्याच हक्काचे पैसे मिळावेत म्हणून कोट्यवधी लोक बँकांच्या दारात उभे असताना सावर्डेकरांसारखे लाचखोर याच दोन हजारच्या नोटांच्या माध्यमातून चाल मागत आहेत. मोठ्या रकमेच्या परंतु छोट्या आकाराच्या या नवीन नोटेमुळे लाचखोरांची सोय झाली असून सरकारचा दावा फोल ठरल्याची टीका सचिन सावंत यांनी केली.
काळा पैसा पुन्हा निर्माण होणार नाही यासाठी मोदी सरकारने कोणतेच पाऊल उचलले नाही. केवळ नोटाबंदीचा निर्णय घेत देशभरातील सर्वसामान्य जनतेला अमर्याद कष्टांच्या वावटळीत ढकलून दिले. लोकपाललोकपाल नियुक्ती बाबत काहीच कारवाई केली नाही. काळ्या पैशाच्या संदर्भामध्ये जोपर्यंत धनदांडग्या उद्योजकांवर, व्यापा-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत सरकारची भूमिका प्रामाणिक नाही आणि पंतप्रधानांचे अश्रू हे दिखाव्याचेच ठरतील, असे सावंत म्हणाले. दोन हजार रूपयांच्या नवीन नोटांचा जसा रंग उडतोय तसाच गरिबांच्या चेह-याचा रंग उडाला आहे. शेतमाल विकला जात नाही, ग्रामीण भागात नव्या नोटाच पोहचल्या नाहीत. हातावर पोट असणा-या ‘नाही रे’ वर्गाने ५० दिवस उपाशी राहण्याचा सल्ला देऊन मोदी फक्त ‘आहेरे’ वगार्चाच विचार करतायत हे स्पष्ट होते, असे सावंत म्हणाले.