ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्ह्यात दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला असून शहरात राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्या तर ग्रामीण भागात आरएसपीची एक तुकडी नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरासह ग्रामीण भागात ६०ठिकाणी नाकाबंदी करून पेट्रोलिंग वाढवण्यात येणार आहे. निवडून येणार्या उमेदवारांना मतमोजणीनंतर विजयी मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वाहतुकीचा बोजवारा उडू नये म्हणून मतमोजणी केंद्राकडे ये-जा करणार्या रोडवरील वाहतुकीस बंदी घातली आहे. ठाणे आणि कल्याण या मतदारसंघांंतील मतमोजणी शहरी तर पालघर आणि भिवंडी या मतदारसंघांतील मतमोजणी ग्रामीण भागात होणार आहे. शहरातील मतमोजणी केंद्रांवर २ पोलीस उपायुक्त, ३ सहायक पोलीस आयुक्त, ९ पोलीस निरीक्षक, ५३ उपनिरीक्षक/ सहायक निरीक्षक, ६४४ पोलीस, १८१ महिला कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्या असा १ हजार १९२ पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर शहरातील ५० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून प्रत्येक स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत पेट्रोलिंग केले जाणार आहे. संवेदनशील समजल्या जाणार्या भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि मुंब्रा या परिसरात स्थानिक पोलिसांची विशेष फोर्स तैनात केली आहे. ग्रामीणमधील मतमोजणी केंद्रांंवर २ अप्पर पोलीस अधीक्षक, ३ पोलीस उपअधीक्षक, १६ निरीक्षक, ५० उपनिरीक्षक/ सहायक निरीक्षक, ६०० पोलीस, ४० महिला कर्मचारी आणि आरसीएफची एक तुकडी असा ७६४ जणांना फौजफाटा तैनात केला असून ग्रामीण भागात १० ठिकाणी नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
बंदोबस्तासाठी दोन हजार पोलीस
By admin | Published: May 16, 2014 1:18 AM