महत्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून गेल्या काही काळापासून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. तसेच या मुद्द्यावरून राजकीय पक्ष आणि नेत्यांपासून विचारवंत आणि सोशल मीडियापर्यंत दोन पडल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नावर फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची आता चर्चा होत आहे.
या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं की, समजा कोस्टल रोड खुला झाला आहे आणि तुमच्यासमोर लाँग ड्राईव्हला जाण्यासाठी गाड्यांचे दोन पर्याय आहेत. त्यातील एक गाडी ही महात्मा गांधी चालवत आहेत. तर दुसरी गाडी ही स्वातंत्र्यवीर सावरकर चालवत आहेत. असं झालं तर तुम्ही कुठल्या गाडीत बसाल? या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,’’ मला स्वत:ला गाडी चालवायला आवडेल. मी त्यांना म्हणेन की, मी गाडी चालवत असताना ज्यांना कुणाला माझ्या गाडीत बसायला आवडेल, त्यांचं स्वागतच आहे’’. फडणवीसांच्या या युक्तिवादपूर्व विधानाला उपस्थितांनीही जोरदार दावा, केला.
गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यात भाजपाने काही नवे मित्रपक्ष जोडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपा सत्तेसाठी कुणालाही सोबत घेऊ शकतो, अशी टीका सुरू झाली आहे. त्यावरून कुठल्या पक्षासोबत भाजपा युती करणार नाही, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस असं उत्तर दिलं. ते म्हणाले की, राजकारणात कधीच कुणी शत्रू नसतो. आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक असतो. मात्र आम्ही काँग्रेसच्या राजकीय धोरणांच्या विरोधात आहोत. त्यामुळे जे त्या विचारसरणीसोबत राहतील, त्यांच्यासोबत आम्ही कधी युती करणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.