सातारा : जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून जप्त केलेला सुमारे ५८ लाखांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने सोनगाव येथील कचरा डेपोमध्ये जाळून नष्ट केला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल यांनी दिली. राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे वाहतूक करताना, तसेच विक्री करताना अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जानेवारी २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत जिल्ह्यामध्ये तब्बल ३८ ठिकाणी छापे टाकून विविध कंपनीचा ५७ लाख ५६ हजार ७०३ रुपयांचा साठा जप्त केला होता. जप्त केलेला गुटखा नष्ट कराव लागतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मंगळवारी दोन ट्रक गुटखा घेऊन सोनगाव येथील कचरा डेपोमध्ये गेले. एका ठिकाणी हा गुटखा ओतून नष्ट करण्यात आला. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे, क्षेत्र अधिकारी इंदिरा गायकवाड, नगरपालिका आरोग्य विभागाचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी एस. एम. साखरे, अन्न सुरक्षा अधिकारी दत्ता साळुंखे, इम्रान हवालदार, यु.एस. लोहकरे, एस.बी. अंकुश, व्ही. व्ही. रुपनवर यांच्यासह अधिकारी व कर्र्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) मोहीम तीव्र करणार जिल्ह्यात आद्यापही कोठेही गुटखा विक्री होत असेल तर नागरिकांनी अन्न औषध प्रशासनाशी संपर्क साधावा तसेच या पुढेही गुटखा विरोधी मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचेही रुणवाल यांनी यावेळी सांगितले.
दोन ट्रक गुटख्यावर ‘अग्निसंस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2015 11:07 PM