मुंबई, दि. 15 - मुंबईतल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या जे. एन. पेटिट इन्स्टिट्युट या इमारतीला मेट्रोच्या भुयाराच्या कामामुळे धोका असल्याचा आरोप झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने या भुयाराच्या कामाला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. यामुळे मुंबई मेट्रो 3 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शुक्रवारी धक्का बसला आहे.
जे. एन. पेटिट ही इमारत 119 वर्षे जुनी असून या भागात अनेक हेरिटेज इमारती आहेत आणि त्यांना मेट्रोच्या कामामुळे धोका असल्याची तक्रार करण्यात आली होती. मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर आणि न्यायाधीश एन. एम. जामदार यांच्या खंडपीठानं एक समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे. मेट्रोच्या भुयारी कामाचा इमारतींवर काय परिणाम होईल याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले असून मेट्रोचे कामही सुरू राहील आणि इमारतींना धोकाही होणार नाही असा मार्ग सुचवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, जे. एन. पेटिट इन्स्टिट्युट आणि आयआयटी मुंबई यांचे स्ट्रक्चरल इंजिनीअर्स या समितीत असतील. ही समिती दोन आठवड्यात अहवाल आणि सूचना देईल असेही न्यायालयाने सांगितले आहे.
एमएमआरडीए, राज्य व मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्याविरोधात जे. एन. पेटिट इन्स्टिट्युटने याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी हायकोर्टात सुरू आहे. कुलाबा, बांद्रे, सीप्झ या मेट्रो तीनच्या भुयारी कामामुळे इमारतींना धोका पोचत असल्याच्या मूळ तक्रारी आहेत. ऑगस्ट 2017 च्या 25 तारखेला भुयाराचे काम सुरू असताना बसलेल्या हादऱ्यांमुळे पेटिट इन्स्टिट्युटचं छत पडलं होतं. गुरुवारी चेल्लुर यांनी मेट्रोचं काम थांबवता येणार नाही हे स्पष्ट केलं होतं कारण हा प्रकल्प समाजाच्या कल्याणासाठी आहे. अर्थात, या भागातल्या इमारतींची पाहणी करण्याची याचिकाकर्त्यांची विनंती मात्र मान्य करण्यात आली.