औरंगाबाद, दि. 4 - शिक्षिकेच्या मोबाइलच्या व्हॉटस् अॅपवर अश्लील मेसेज आणि ब्ल्यू फिल्म पाठविणा-या दोन कामगारांना छावणी पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. यातील एकाला उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमळा येथून, तर दुस-याला बजाजनगरातून ताब्यात घेण्यात आले.
गोपाल दयाराम भारती (वय २०, ह.मु. येरमळा) आणि कलीम सलीम इद्रीस (वय २०, ह.मु. बजाजनगर, वाळूज परिसर, दोघे मूळ रा. गढवा, ता. इटावा, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना छावणी पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपी एकाच मालकाच्या दोन वेगवेगळ्या कंपनीमधील कामगार आहेत. तक्रारदार शिक्षिकेच्या मोबाइलवर दोन वर्षांपासून ते अश्लील टेक्स मेसेज पाठवीत. या मेसेजकडे पीडितेने सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, मेसेज येण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांनी त्या मोबाइलधारकास फोन करून तुम्ही असे घाणेरडे मेसेज पाठवू नका, अशी विनंती केली;
परंतु आरोपींनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि मेसेज पाठविणे सुरूच ठेवले. त्यानंतर आरोपींनी तक्रारदारांच्या व्हॉटस् अॅप या सोशल मीडियावर अश्लील चित्रे आणि ब्ल्यू फिल्म पाठविण्यास सुरुवात केली. या प्रकाराची माहिती पीडितेने तिच्या पतीला दिली. आरोपीचे हे कृत्य थांबविण्यासाठी त्यांनी आरोपीच्या मोबाइलवर फोन करून त्यांना खडसावले. त्यानंतर काही दिवस शांत राहिल्यानंतर आरोपींनी पुन्हा पीडितेस घाणेरडे मेसेज पाठविणे सुरूच ठेवले आणि दम असेल तर पकडून दाखवा, असे चॅलेंजच आरोपींनी दिले होते.
मोबाइल नंबर ब्लॉक केल्यानंतरही त्रास सुरूचआरोपी गोपालचा मोबाइल नंबर ब्लॉक केल्यानंतर आरोपीने त्याचा मित्र कलीम यास त्या नंबरवर मेसेज पाठविण्यास सांगितले. कलीम हादेखील बिनधास्तपणे अश्लील चित्रफीत टाकू लागला. रोजच्या या घाणेरड्या प्रकारामुळे शेवटी पीडिता आणि तिच्या पतीने छावणी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. एस.आर. जोशी यांनी सायबर क्राइम सेलच्या मदतीने आरोपींच्या ठिकाणांचा शोध घेतला आणि रात्री त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.