मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चामधील दोन कार्यकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, शासनाकडून चर्चेसाठी आलेले निमंत्रण संघटनेने फेटाळल्याचा दावा संघटनेच्या समन्वयकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.समन्वयक निशांत सकपाळ म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाज १५ नोव्हेंबरपर्यंत शांततेचा मार्ग अवलंबणार आहे. मात्र महाराष्ट्र बंददरम्यान ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते तत्काळ मागे घेण्याची प्रमुख मागणी समन्वयकांनी केली आहे. २ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणास सुरुवात झाली आहे. तबब्ल ४० हून अधिक मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत. या मृत मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सकपाळ म्हणाले.दरम्यान, सरकारतर्फे शुक्रवारी सायंकाळी चर्चेसाठी बोलावण्यात आले असता भेट नाकारल्याचा दावा सकपाळ यांनी केला आहे. यापुढे कोणतीही चर्चा न करता सरकारने निर्णय जाहीर करावा, याच शर्तीवर उपोषण सुरू केल्याचे सकपाळ यांनी सांगितले.
मराठा क्रांती मोर्चातील दोन कार्यकर्ते रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 6:09 AM