पुणे : मोबाईलमध्ये एखाद्या मुलीच्या परवानगीशिवाय फोटो काढणे यापुढे चांगलेच महागात पडू शकते. कारण एका अल्पवयीन मुलीचा तिच्या नकळत फोटो काढणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दोन वर्षांची सक्तमजुरी आणि एक हजारांचा दंड सुनावला आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी हा आदेश दिला. ही घटना १४ जून २०१४ रोजी घडली होती. गणेश मारुती पारखे (वय २५, रा. कात्रज) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १५ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सरकारी वकील सुनील मोरे यांनी ४ साक्षीदार तपासले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कात्रज भागात राहण्यास आहे. आरोपी तिला नेहमी त्रास देत हातवारे करीत होता. पीडित मुलगी १४ जून २०१४ रोजी भावासोबत बॅडमिंटन खेळत होती. त्या वेळी आरोपीने तिचे फोटो मोबाईलमध्ये काढले होते. रस्त्यावरून जात असलेल्या काही नागरिकांनी त्याचे हे कृत्य पाहिले होते. नागरिकांनी त्याचा मोबाईल काढून घेत पोलिसांना बोलावून घेतले. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. >मोबाईलमध्ये मुलीचे फोटो आढळून आले होते. न्यायालयाने त्याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. या खटल्यात फोटो काढताना पारखे याला रंगेहात पकडलेल्या व्यक्तीची साक्ष महत्त्वाची ठरली.
मुलीचा फोटो काढल्याने दोन वर्षे सक्तमजुरी...!
By admin | Published: August 27, 2016 12:54 AM