- ज. वि. पवारकॉ. गुलाबराव गणाचार्य यांचे २0 नोव्हेंबर १९७३ या दिवशी महापालिकेच्या दवाखान्यात निधन झाले. आमदारपद भोगूनही गुलाबराव खासगी दवाखान्यात उपचार घेऊ शकले नाहीत, कारण त्यागी परंपरेतील ते एक विचारनिष्ठ कार्यकर्ते होते.कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या नेत्यांना १९२५ नंतर कम्युनिस्ट नेते म्हणून ओळखण्यात येऊ लागले. वर्गविग्रह आणि वर्णविग्रहाच्या भिंतीतील अंतर वाढू लागले. पण तरीही सर्व जाती-धर्मातील जनसामान्यांना आधार वाटतील असे कम्युनिस्ट नेते होते कॉ. गुलाबराव गणाचार्य. गुलाबराव हे वेगळ्या मुशीतून निर्माण झालेले कार्यकर्ते होते. भगतसिंग हा त्यांचा आदर्श होता. धर्म, जातिभेदाची, उच्च-नीचतेची जुनाट जळमटे फेकून दिल्याशिवाय कष्टकऱ्यांची खंबीर व टिकाऊ एकजूट होणार नाही, यावर भगतसिंगांचा विश्वास होता. त्यातूनच गुलाबराव आपल्या अस्पृश्य साथीदारांच्या घरीदारी जाऊ लागले. त्यामुळेच पुढे गुलाबरावांना त्यांच्या उत्तरार्धात सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आपला नेता मानले. साम्यवादी कार्यकर्ता म्हटला की तो धर्मनिरपेक्ष असणार अशी आपली भाबडी समजूत असते. काही वेळा या धर्मनिरपेक्षतेला सर्वधर्मसमभाव याचा गिलावा देण्यात येतो. वैयक्तिक जीवनात धर्मश्रद्धेला तर सार्वजनिक जीवनात धर्मनिरपेक्षतेला महत्त्व दिल्यामुळे, अशा कार्यकर्त्यांची कुतरओढ होते. दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याच्या प्रकारामुळे ते एका विशिष्ट विचाराचे पाईक ठरत नाहीत. बहुतेक साम्यवाद्यांची हीच शोकांतिका असते. गुलाबराव हे मार्क्सवादी होते. त्यांनी मात्र स्वत:शी प्रतारणा केली नाही आणि म्हणूनच ते अखेरपर्यंत कम्युनिस्ट नेते म्हणूनच जगले. काही नेत्यांनी आपल्या विचारांपासून फारकत घेतली. त्यांचे आचार आणि विचार यात अंतर पडू लागले. ते स्वत:ला पुरोगामी म्हणत असले तरी आचरणाने मात्र प्रतिगामीच होते. त्यामुळे कष्टकरी वर्ग हा धर्म, जात, पंथ यांच्या कारस्थानाला बळी पडून विभागला जात असे. उदाहरणार्थ ते गिरणीत काम करत असताना श्रमिक असत, परंतु गिरणीतून बाहेर पडताच त्यांना जाणीव करून दिली जात असे, ती जातीय खुराड्याची. गिरणीच्या चिमणीच्या धुरांड्यात हा खुराडा खरे तर नष्ट व्हायला हवा होता, मात्र तसे झाले नाही. उलट अशा जातीय खुराड्यांची संख्या वाढली. कष्टकरी वर्ग धर्म, जात, पंथ आणि प्रादेशिकता यांना बळी पडला. गुलाबराव मात्र या चारही शत्रूंबरोबर दोन हात करत राहिले. कॉ. बापूराव जगताप, कॉ. पाटकर, कृष्णा देसाई ही त्यांची शक्तिस्थळे होती. त्यांच्यामुळे गुलाबराव अल्पसंख्याकांचेही संरक्षक कवच ठरले. २१ मे १९१८ रोजी एका खेड्यात जन्मलेले गुलाबराव स्वकर्तृत्वाने यशाची अनेक शिखरे गाठत गेले. अल्पशिक्षित असले तरीही अनुभवाच्या विद्यापीठाचे कुलगुरू होते. द्वारसभा ते विधानसभा हा त्यांचा प्रवास विस्मयकारक ठरला. १९५७ साली मुंबई महापालिकेत निवडून आल्यावर व तेथील कर्तृत्वावर त्यांनी १९६७ ची विधानसभा जिंकली आणि तीही काँग्रेसच्या मंत्र्याचे डोळे पांढरे करून. हे त्यांना शक्य झाले कारण अनेक सामान्यांचा तो आधारवड होता. त्यांची पाळेमुळे खोलवर जमिनीत रूजली होती. हा आधारवड उन्हात उभा राहिला, मात्र सामान्य माणसाला थंड सावली दिली. गुलाबराव गणाचार्य मुंबईतील कष्टकऱ्यांचे हितवर्धक होतेच, परंतु त्यांनी विधिमंडळात काम करताना आपण एका पक्षाचे आहोत हे विसरून सकल महाराष्ट्राच्या जनतेच्या उन्नयनासाठी ते झटले. हॉटेल कामगारांचे तर ते लाडके नेते होते. हॉटेल मजूर सभेचे ते अध्यक्षच होते. या हॉटेल कामगारांच्या प्रश्नाचे निशाण त्यांनी झेकोस्लाव्हिया, पोलंड, जर्मनी या देशांत फडकविले. त्यांना त्या त्या देशाची भाषा येत नसेल, इंग्रजीवरही प्रभुत्व नसेल, परंतु कामगारांचे दु:ख त्यांना कळत होते. त्यासाठी भाषेचे बंधन नसते. गुलाबराव सत्तेत नव्हते, सत्तेची फळे त्यांनी कधी चाखली नाहीत, परंतु सत्ताधीशांवर अंकुश ठेवण्याचे काम त्यांनी केले.१९६७-६८ साली मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून प्रभावी काम केले. ते कम्युनिस्ट पक्षाचे असल्यामुळे नव्हे, तर प्रभावी नेते असल्यामुळे जानेवारी १९७१ साली रशिया येथील अधिवेशनात भारतातील कष्टकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले. आपल्या जीवन प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी गंगूबार्इंचे समर्थन मिळाले. एकाच वेळी पती आणि पत्नी यांनी कारावास भोगणारी मोजकीच जोडपी भारतीय राजकारणात दिसतात, हे दोघे त्यापैकीच एक.
त्यागी गुलाबराव गणाचार्य
By admin | Published: May 21, 2017 12:15 AM