लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विदर्भातील वाळू ठेकेदाराकडून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातील टायपिस्टला मलबार हिल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महेश सावंत (३८) असे त्यांचे नाव असून, न्यायालयाने त्यांनी ९ मेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावंत हा राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडे टायपिस्ट म्हणून काम करतो. कार्यालयातील फायलींमधून दोन महिन्यांपूर्वी त्याने विदर्भातील एका वाळू ठेकेदाराचा नंबर मिळविला. कार्यालयामध्ये अन्य कर्मचारी नसताना, सावंतने या ठेकेदाराला कार्यालयात बोलावून त्याच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली. रक्कम न दिल्यास मंत्री कदम यांच्याशी बोलून कारवाई करण्याची धमकी दिली. सुरुवातीला ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मात्र, सावंत त्याला १० लाखांसाठी सतत फोन करू लागला. अखेर या ठेकेदाराने मंत्री रामदास कदम यांचे कार्यालय गाठून कदम यांच्या पीएकडे सावंतबाबत तक्रार दिली.पीएने ही बाब कदम यांना सांगितली. त्यानुसार, कदम यांच्या आदेशावरून त्यांच्या पीएने गुरुवारी मलबार हिल पोलिसांत महेश सावंतविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, मलबार हिल पोलिसांनी सावंतविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी सावंत याचा फोन टॅप केला. त्यात तो ठेकेदाराकडे खंडणी मागत असल्याचे आढळले. याबाबत सावंत मात्र, अनभिज्ञ होता. तो नेहमीप्रमाणे कामावर येताच शनिवारी त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. या कारवाईमुळे नानाविध चर्चांना पेव फुटले आहे. यात अन्य काही कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का? याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक बी. सावंत यांनी दिली.
खंडणीच्या गुन्ह्यात टायपिस्टला अटक
By admin | Published: May 08, 2017 5:01 AM