- निकिता तिवारी, मुंबईतरुणांनी मराठी साहित्याकडे वळावे यासाठी यामिनी दळवी या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने पुढाकार घेतला आहे. २७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिनानिमित्त ती ‘म...मराठीचा’ ही यू-ट्यूब वाहिनी सुरू करणार आहे. ‘म...मराठीचा’ यू-टयुब चॅनेल लाँच करण्यासाठी अनेक तरुण एकत्र येणार आहेत. यात मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य, कला इ. संंबंधित वेगवेगळे उपक्रम असणार आहेत. या चॅनेलचे मध्यवर्ती कार्यकारी मंडळ म्हणून पूजा भांडगे, अमोल शिंदे, प्रसाद हावळे, शशिकांत कोळ, लीना दातार, प्रथमेश तुंगावकर काम पाहणार आहेत. ही सगळी तरुण मंडळी स्वत: वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकरी करत असून मराठी भाषा सुदृढ व्हावी यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाशी जोडली गेली आहेत.या यू-ट्युब वाहिनीवर २७ फेबु्रवारीला कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त कुसुमाग्रज यांच्यावर आधारित माहितीपट सादर करण्यात येणार आहे. या माहितीपटामध्ये कुसुमाग्रजांच्या सहवासातील ज्येष्ठ कवींच्या मुलाखती आणि आताच्या पिढीने सादर केलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितांचा समावेश असणार आहे. तसेच अशोक बागवे, अरुण म्हात्रे यांच्याही मुलाखतींचा त्यात समावेश असेल. भविष्यात या यू-ट्युब वाहिनीच्या व्यासपाठीचा वापर मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी केला जाईल. हा माहितीपट राज्यभरातील शाळांमध्ये दाखवला जाणार असून आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचेल. यासाठी विविध शाळांतील व्यवस्थापन सदस्यांशी चर्चा सुरू आहे, असे यामिनीने ‘लोकमत’ला सांगितले.
‘म...मराठीचा’ यू-ट्यूब वाहिनी
By admin | Published: February 27, 2016 3:54 AM