मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात संयुक्त अरब अमिरातीची सरकारी कंपनी बिन जयेद इंटरनॅशनल एमएलसी ही ४६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत पत्रकारांना ही माहिती दिली.‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेस गेले दोन दिवस गुंतवणूकदारांनी ज्या पद्धतीने जोरदार प्रतिसाद दिला त्याने उत्साहित झालेले मुख्यमंत्री म्हणाले की या परिषदेच्या निमित्ताने जवळपास १२ लाख कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी आधी १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या परिषदेच्या निमित्ताने होईल, असे म्हटले होते.लॉजिस्टीक, कृषी आधारित उद्योग, एरोस्पेस, आॅटोमोबाइल क्षेत्रात लहान शहरांनजीक येत्या काळात मोठी गुंतवणूक होईल. त्यात नांदेड, परभणी, वर्धेचा समावेश असेल. नंदुरबारमध्ये बांबू कारखाना उभारला जाईल,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईहून पुण्याला केवळ २० मिनिटात पोहोचविणारी हायपर लूप सेवा उभारण्याची घोषणा कालच करण्यात आली होती. नागपूर-मुंबई हायपर लूपसाठी आपली एका कंपनीशी चर्चा झाली आहे मात्र, त्यात अद्याप प्रगती झालेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले.
‘समृद्धी महामार्गासाठी यूएईची गुंतवणूक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 4:30 AM