शिवेसा (UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर साजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यानंतर आता शिवेसना (ES) नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, आनंदाची गोष्ट आहे. फडणवीस यांच्यावर आरोप करून काय निष्पन्न झाले? तर आमदार कमी होऊन २० वर आले. ते सर्व आता आमच्या संपर्कात आहेत," असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला आहे. ते नागपुरात पत्रकारांसोबत बोलत होते.
शिरसाट म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, आनंदाची गोष्ट आहे, संस्कृती आहे. निवडणुकीच्या काळात काय बोलले होते, हे आठवलं असे तर मनातल्या मनात त्यांनाही वाटत असेल की, आपण चुकीचं बोललो. मुख्यमंत्र्यांना भेटताना त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी केली नसावी, असे मला वाटते. एक सामान्य भेट म्हणून भेटले. एक दिवस विधान परिषदेत आले आणि काल संध्याकाळी ९:३० च्या सुमारास विमानाने मुंबईकडे रवाना झाले. हा त्यांचा एकूण कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने झालेली ती भेट आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्यावर बरेच आरोप केले होते? असे विचारले असता शिरसाट म्हणाले, "त्या आरोपांची जाणीव त्यांना झाली ना. आरोप करून काय निष्पन्न झाले? तर आमदार कमी झाले आहेत. २० वर आले. भविष्यात काय होईल याचा तुम्हाला अंदाज येतोच आहे.
यावर, आजून आमदार कमी होतील का? असा प्रश्न केला असता, शिरसाटांनी मोठा गौप्य स्फोट केला आहे, "कमी होतील म्हणजे ते तेथे राहायला हवेत ना? ते सर्व आता आमच्या संपर्कात आहेत. पाहू, कधी निर्णय घ्यायचा, तसा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील," असे शिरसाट म्हणाले.