लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याला वैशाख वणव्याचे चटके बसत असतानाच ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे, ऊन, वारा आणि पाऊस असे तिहेरी वातावरण राज्यात सर्वत्र असून, १० ते १३ मे दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर १३ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असाही इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश नोंदवण्यात येत असून, वाढलेल्या उकाड्याने मुंबईकर घामाघूम झाले आहेत.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे.मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश नोंदवण्यात येत असून, आर्द्रतेतही चढ-उतार होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, मागील तीन दिवसांपासून मुंबईचे हवामान ढगाळ असून, ऊन्हाचा कडाकाही वाढला आहे. हवामानातील बदलामुळे उकाड्यात वाढ होत असून, वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे.हवामान खात्याचा इशारा-१० मे : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस ११ मे : राज्याच्या संपूर्ण भागात तुरळक ठिकाणी पाऊस १२ मे : राज्याच्या संपूर्ण भागात तुरळक ठिकाणी पाऊस १३ मे : दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस १३ मे : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटमुंबईचे हवामान -१० आणि ११ मे : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २५ अंशाच्या आसपास राहील.
मुंबईत उकाडा कायम!
By admin | Published: May 10, 2017 2:38 AM