Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर देशातील वातावरण तापण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. राज्यातही महाविकास आघाडी एकत्र लढण्यास इच्छूक आहे. मात्र, जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी येऊ शकते, असे म्हटले जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावरून आता शिवसेना शिंदे गटातील एका नेत्याने प्रतिक्रिया देताना, प्रकाश आंबेडकर बरोबरच बोलले, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीपासून दूर राहावे, असा सल्ला दिला आहे.
मीडियाशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या नादी लागू नये. त्यावर बोलताना सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. प्रकाश आंबेडकर तळागाळात काम करणारे नेते आहेत. ते जर बोलत असतील तर त्यावर उद्धव ठाकरेंनी विचार करणे गरजेचे आहे. ठाकरे गट आणि वंचित यांनाच एकत्र यावे लागेल. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर किती कंफर्टेबल असतील मला माहिती नाही, असे उदय सामंत म्हणाले.
महाविकास आघाडी पुढे सत्तेत येणार नाही
काँग्रेस केंद्रीय नेतृत्वात अडकले आहे. तर राष्ट्रवादी कुटुंबवादात अडकलेले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, मी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत होतो, पण २०१४ ला राष्ट्रवादी सोडली. आता मी शिवसेनेत आहे. पण एवढे निश्चितपणे सांगतो की, महाविकास आघाडी पुढे सत्तेत येणार नाही, असा दावा उदय सामंत यांनी केला.
दरम्यान, कितीही नागनाथ-सापनाथ एकत्र आले तरी सरकार आमचेच येणार. त्यांच्याकडे नागनाथ-सापनाथ आहेत. पण आमच्याकडे एकनाथ आहेत, त्यामुळे आमचेच सरकार येणार आहे, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.