राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे गटातील आमदारांनीही याविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. याच दरम्यान आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एक जुना फोटो शेअर करत निशाणा साधला आहे.
"आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का?" असा रोखठोक सवाल देखील विचारला आहे. उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. "राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद माजी आमदार प्रकाश गजभिये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तत्कालीन विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मुजरा करताना... आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा हा अपमान नाही का???" असं सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 'आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता उदय सामंत यांनी जुना फोटो शेअर करत ट्विट केलं आहे.
सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "पाच महिन्यांपूर्वी आम्ही चाळीस आमदार "वाघ" होतो. आम्ही उठाव केला मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आम्ही "रेडा" झालॊ.. किती ती चिडचिड.. "मी कुठंतरी वाचलंय रेडा हे यमाच वाहन आहे"" असं देखील उदय सामंत यांनी आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"