व्ही. एस. कुलकर्णी -
उदगीर (जि. लातूर) : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या सारस्वतांच्या स्वागतासाठी मराठवाडा, महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, तेलंगणाचा सीमाप्रांतही सज्ज झाला आहे. बुधवारच्या अजय-अतुलच्या संगीत रजनीमुळे संमेलनाची वातावरण निर्मिती झाली आहे. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीत होणाऱ्या संमेलनाच्या स्वागतांच्या कमानी ठिकठिकाणी उभारण्यात आल्या आहेत.
या संमेलनाची धुरा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने आपल्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त पेलली आहे. महाविद्यालयाच्या ३६ एकरांत व्यासपीठांसह विविध दालने उभारण्यात आली आहेत. मुख्य मंडपाला छत्रपती शाहू महाराज सभागृह असे नाव आहे. येथील व्यासपीठाला उदयगिरी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. ना. य. डोळे व्यासपीठ म्हणून संबोधण्यात येणार आहे.
परिसंवादाचे दालन लोकनेते विलासराव देशमुख सभागृह आहे. याशिवाय, शांता शेळके कविकट्टा हा देवीसिंह चौहान सभागृहात, तर सुरेश भट गझलकट्टा हा सिकंदर अली वज्द सभागृहात रंगणार आहे. ग्रंथ प्रकाशनाची तीन स्वतंत्र दालने, चित्र-शिल्प कलादालन, अभिजात मराठी दालन, बालमेळाव्याचे स्वतंत्र दालन असे आहेत. साहित्यनगरीचे प्रवेशद्वार उदगीर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीने स्वागताला सुसज्ज झाले आहे.
शब्दोत्सवाचा आनंद घ्यावा संमेलनासाठी तीन महिन्यांपासून अनेकांचे हात परिश्रम घेत आहेत. रसिकांनी संमेलनाला उपस्थित राहून शब्दोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य कार्यवाह रामचंद्र तिरुके, कोषाध्यक्ष प्रा. मनोहर पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले आहे.
तीन प्रांतांना जोडणारी ग्रंथदिंडी - यंदाची ग्रंथदिंडी तीन वैशिष्ट्यांच्या पालखीतून मिरवणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सीमांना एकसंध करणाऱ्या या ग्रंथदिंडीचे नेतृत्व महिलांचे पथक करणार आहे.
- दुसरे वैशिष्ट्य ‘गुगलविधी’. कर्नाटकातील गुगल नृत्य प्रकारानुसार विवाहापूर्वी वाजतगाजत, नृत्य करीत देवतेची पूजा करण्याचा हा विधी अनुभवायला मिळणार आहे. - मराठी भाषेच्या नवरसांची समृद्धी दर्शविणारी नवरंगदिंडी तिसरे वैशिष्ट्य. यात ५०० शालेय विद्यार्थी नऊ रंगांच्या टोप्यांसह सहभागी होणार आहेत.