सचिन जवळकोटे / साताराइथली राष्ट्रवादीची फौज सध्या भलत्याच कामात गुंतलीय. त्यांच्याच पक्षाच्या खासदारांची मिशी उतरावयाला आसुसलीय, पण गोची ही की, हे खासदार दुसरे-तिसरे कोणी नसून चक्क उदयनराजे आहेत.सातारा पालिका निवडणुकीत त्यांचे बंधू अन् राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आघाडीला धूळ चारल्यानंतर, तर उदयनराजेंची देहबोली अधिकच आक्रमक जाहली. शर्टाची कॉलर अधिकच वरच्या बाजूला सरकली. ‘साताऱ्याचा पुढचा आमदार सर्वसामान्य घराण्यातलाच असेल, अन्यथा मिशी उतरवू!’ अशी भीष्म प्रतिज्ञा उदयनराजेंनी नुकतीच जावळी खोऱ्यात केली. तेव्हा चिडलेल्या शिवेंद्रसिंहराजेंनीही ‘उदयनराजे स्वत:ची मिशी खासदारकीच्या निवडणुकीतच काढतील,’ अशी घोषणा करून, जणू पक्षातल्या स्थानिक नेत्यांचा अजेंडाच जाहीर केला. कारण डीसीसी बँकेच्या माध्यमातून विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील अन् माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर हे अजित पवारांचेच नेतृत्व मानतात. विशेष म्हणजे, उदयनराजे अन् अजितदादा यांच्यात तर छत्तीसचा आकडा.त्यामुळे पुढच्या लोकसभेला उदयनराजे खासदारच असणार नाहीत किंवा असले, तरी राष्ट्रवादीचे असणार नाहीत, ही या नेत्यांची गुप्त मोहीम शिवेंद्रसिंहराजेच्या घोषणेतून पूर्णपणे स्पष्ट झाली आहे अन् त्याची नांदी यंदाच्या झेडपी निवडणुकीत दिसून येऊ लागलीय. भाजपाचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे पालकमंत्री विजय शिवतारे अन् शेतकरी संघटनेचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत या तिघांची भेट घेऊन ‘राष्ट्रवादीच्या विरोधात महाआघाडी’ उभारण्याचा प्रयत्न उदयनराजेंकडून केला जातोय. हे कमी पडले की काय, म्हणून त्यांना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार जयकुमार गोरे यांचीही आतून चांगलीच साथ मिळतेय. म्हणूनच की काय, लोकसभेचा काटा इथेच ठेचण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सारे नेते कधी नव्हे ते एकत्र आलेत.
उदयनराजेंच्या मिशीवर ‘घड्याळ’वाल्यांचा डोळा!
By admin | Published: January 26, 2017 2:12 AM