मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज असलेले सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांची क्रेझ तरुणांमध्ये प्रचंड आहे. त्यात सातारमध्ये उदयनराजेंना मानणारा मोठा युवक वर्ग आहे. गेल्यावर्षी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील विजयी झाले.
उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यातील चाहता निलेश जाधव याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहिलं आहे. या पत्रात या तरुणाने मागणी केली आहे की, छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रिपद द्यावं, छत्रपतींच्या गादीचा सन्मान करावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
या पत्राबाबत उदयनराजेंनी म्हटलं आहे की, या तरुण कार्यकर्त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रक्ताने पत्र लिहले आहे. या दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेला हा प्रयत्न मला नक्कीच रुचला नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांचा जीव माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. हे असे प्रकार मला नक्कीच आवडणार नाहीत कोणीही असे प्रयत्न करू नये अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.
लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र अवघ्या तीन महिन्यात उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री व तत्कालीन भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. उदयनराजे पोटनिवडणुकीत विजयी व्हावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साताऱ्यात जाहीर सभादेखील घेतली होती.
राज्यसभेचे महाराष्ट्रात एकूण १९ खासदार आहेत. त्यापैकी ७ खासदार २ एप्रिल २०२० रोजी रिक्त होणार आहेत. यामध्ये शरद पवार, मजिद मेमन (राष्ट्रवादी), अमर साबळे (भाजपा), राजकुमार धूत (शिवसेना), हुसेन दलवाई (काँग्रेस), रामदास आठवले (रिपाइं), संजय काकडे (अपक्ष) यांचा निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये समावेश आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभा सदस्य झाले होते. तसेच भाजपाच्या केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश आहे. आता त्यांची मुदत २ एप्रिल रोजी संपत आहे. भाजपाचे दुसरे खासदार अमर साबळे यांची मुदतही २ एप्रिल रोजी संपणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर माजी खासदार उदयनराजे भोसले यांना नियुक्ती दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.