साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख निश्चित केली आहे. विशेष म्हणजे उदयनराजेंसोबतच शिवेंद्रराजेराजे भोसले हेही विधानसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे उदयनराजेंनी शिवेंद्रराजे आणि त्यांचा स्वत:चा फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच कमळाचं चिन्हही त्यांच्या फोटोसह दिसून येतंय.
उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येण्याचं आवाहन केलंय. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता गांधी मैदान, राजवाड सातारा येथे कार्यर्त्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. भव्य मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन करत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. अद्याप भाजपाकडून उमेदवारांची घोषणा झाली नाही. मात्र, उदयनराजेंनी कमळाच्या चिन्हासह, आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे ट्विट केलंय. तसेच भाजपाचे अधिकृत उमेदवार असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहंलय. त्यामुळे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांना साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. ही जागा राष्ट्रवादीची असली तरीही दोन्ही पक्षांतील नेत्यांचा चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह आहे. काँग्रेसच्या छाननी व केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले. साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात लाट तयार होत आहे. चव्हाण यांच्या नावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे,’ असे वडेट्टीवार सांगितले. विशेष म्हणजे काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या 51 उमेदवारांच्या यादीत पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव नाही. त्यामुळे ही शक्यता आणखी वाढली आहे.