सातारा - ‘कोणत्याही व्यक्तीने बोलण्यापूर्वी आपली वैचारिक उंची, पात्रता पाहावी. आपण कोणाबद्दल बोलतोय, याचा विचार केला पाहिजे. श्रीपाद छिंदम याने महाराष्ट्राचे आराध्यदैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून कुप्रवृत्तीचे प्रदर्शन केले,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी श्रीपाद छिंदम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा पुरुष जन्माला यायला युगाचा कालावधी लागत असावा. इतके महान कर्तृत्व युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे. जातीपातीचा भेदभाव न ठेवता, सर्व जातीधर्माला समान न्याय देत, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारणी केली. त्याकरिता त्यांनी असिम त्याग केला. राज्यकर्ता कसा असावा, जनतेप्रती त्याचे उत्तरदायित्व काय असावे, वंचितांना मुख्य प्रवाहात कसे आणावे, शेतकरी जगाचा पोश्ािंदा असल्याने, त्याच्या बाबतीत कोणती राजनिती असावी, न्यायदान कसे असावे, महिला-भगिनींविषयी राज्यकर्त्यांचे काय धोरण असावे, युद्धनिती कशी असावी, गनिमी कावा केव्हा राबवावा? आदी प्रश्नांवर छत्रपती शिवाजी महाराज यांनी ठरवून दिलेली शिवनिती जगात सर्वश्रेष्ठ ठरली आहे. छत्रपती शिवरायांबाबतीत काही बोलण्यापूर्वी छत्रपती शिवराय आधी समजून घ्यावे लागतात. श्रीपाद छिंदमसारख्या उचलली जीभ लावली टाळाल्या, अशा नितीमत्तेच्या व्यक्तींना शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी कदाचित अनेक जन्म घ्यावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराजच नव्हे तर कोणत्याही महापुरुषावर कोणी टीका करतो, त्यावेळी मनस्वी संताप येतो. त्यांनी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष समजून घ्यावेत.
ज्यांची क्षमता आणि पात्रता नाही अशा व्यक्ती काहीही बोलतात. त्यांच्या त्या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याची सुबुद्धी मिळो. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांनी संयम ठेवून मोठ्या दिमाखात शिवजयंती महोत्सव साजरा करावा. शिवजयंती उत्सवात कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता, शिवप्रेमींनी कार्यरत राहावे, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.