मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भावुक झाले होते. मात्र याचवेळी त्यांनी अजब मागणी केली. पवारांचा दिल्लीतील बंगला आणि गाडी वापरायची मुभा द्यावी अशी मागणी त्यांनी केली. सातारा येथे पत्रकारांशी सवांद साधला असताना ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर आज सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यांनतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाणारे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार जर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर मी फॉर्म भरणार नाही. मात्र त्यांनी त्यांचा दिल्लीतील बंगला आणि गाडी मला द्यावा अशी अजब मागणी उदयनराजे यांनी यावेळी केली. त्यांच्या या मागणीमुळे मात्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले की, शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. पवार हे आदरणीय नेते असून काल, आज आणि भविष्यातही आदरणीय असतील. आज मला माझ्या वडिलांचा आठवण येते त्याच्यानंतर पवारांनी मला प्रेम दिले, असे म्हणत उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. तर पुढे ते म्हणाले की, नवाब मलिक हेही माझ्या बद्दल बोलले. मात्र त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण, कधीतरी अंतर्मनात झाकून बघा. मी स्वाभिमान सोडलेला नाही, कुणीपण कायपण बोलायचं. मी ऐकून घ्यायचं. एवढ्या काय मी बांगड्या भरल्या नाहीत. हिंमत असेल तर चॅलेंज घ्या, कुणीपण या समोरासमोर बसा असे म्हणत उदयनराजेंनी टीकाकारांचा समावेश घेतला.