फलटण / वाठार निंबाळकर : ‘छत्रपतींचे तेरावे वंशज बेताल झाले असून, त्यांच्या १३ पिढ्या असल्या, तर आमच्या २८ पिढ्या झाल्या आहेत. त्यांचे बगलबच्चे म्हणतात, सरदाराने सरदारासारखे वागावे; पण फलटणकर नाईक-निंबाळकर हे छत्रपतींचे सरदार कधीही नव्हते. फलटणची गादी स्वतंत्र असून, छत्रपतींच्या राजघराण्याची व आमच्या राजघराण्याची तुलना करणे चुकीचे आहे. उदयनराजेंचे आजोबा शेंडगावच्या सरदाराच्या घरातून दत्तक आलेले, तर फलटणला असे काहीच नाही. त्यामुळे उदयनराजे कुठले थेट वंशज... ते तर फक्त दत्तक आहेत,’ अशा शब्दात रामराजे व रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी हल्लाबोल केला. फलटण तालुक्यातील निरगुडी, उपळवे, ढवळमध्ये श्रीराम कारखान्याच्या प्रचारसभेत रामराजे व निंबाळकर बंधू बोलत होते. रामराजे म्हणाले, ‘दोन महिन्यांपूर्वी मला मोठा भाऊ म्हणणारे आज मला भ्रष्टाचारी म्हणू लागलेत. दोन महिन्यांत असे काय घडले की, मी भ्रष्टाचारी झालो. भ्रष्टाचाराची काय चौकशी करायची ती करा. सत्तेसाठी इकडून तिकडे, तिकडून इकडे करू नका. मी पालकमंत्री असताना त्यांच्या शेजारी बसायचो. त्यावेळी घाणीच्या वासाने मला चक्कर यायची. ही त्यांची लायकी. ज्यांचे आयुष्य बाटली व ग्लासात गेलंय त्यांच्याबद्दल त्याशिवाय काय बोलणार.’रघुनाथराजे म्हणाले, ‘यापुढे छत्रपती म्हणून त्यांना आपण मुजरा घालणार नाही. राजघराण्यात उजव्या हाताने मुजरा घालणे म्हणजे राजाला मुजरा घालणे म्हणतात. तर डाव्या हाताने मुजरा घालणे म्हणजे राजाचा अपमान म्हणतात. त्यामुळे वाटल्यास डाव्या हाताने त्यांना मुजरा घालू. यापुढे आमच्या घराण्यावरील आरोप खपवून घेणार नाही.
दरोड्याच्या गुन्ह्याखाली रामराजे कंपूला अटक करा : उदयनराजेफलटण पालिका हद्दीतील व श्रीराम कारखान्याला लागून असलेली कारखान्याची २१ एकर २० गुंठे जमीन मोठ्या किमतीला विकली जात होती. मात्र, जमीन विक्रीचे कायदे धाब्यावर बसवून, लिलाव प्रक्रिया प्रचंड दबावाखाली करून केवळ तीस कोटींना जमीन विकली आहे.त्यामुळे कारखाना व सभासदांचा गळा घोटण्याबरोबरच कारखान्यावर दरोडा घालण्याचे काम कारभाऱ्यांनी केले आहे. जमीन विकणारे व घेणाऱ्यांची विशेष चौकशी करण्यासाठी संघटित गुन्हेगारी कायद्याखाली संबंधित कंपूला तत्काळ अटक करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.इतके दिवस फक्त रामराजेंवर टीका करणाऱ्या उदयनराजेंनी आता या ‘राजसंघर्षा’त रामराजेंच्या सहकाऱ्यांनाही ओढले आहे.