सातारा : विधानसभेची निवडणूक उंबरठय़ाशी येऊन ठेपली असतानाच ‘मोठा राजकीय भूकंप’ करण्याचे संकेत खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहेत. आपल्या कार्यकत्र्याना सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याच्या पाश्र्वभूमीवर कार्यकत्र्याचा सन्मान होईल, असा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रमुख कार्यकत्र्याची बैठक ‘जलमंदिर पॅलेस’ येथील उदयनराजेंच्या संपर्क कार्यालयात झाली. केवळ उदयनराजेंचे कार्यकर्ते म्हणून विविध विकासकामांच्या संदर्भात आपली जाणूनबुजून अडवणूक होत असल्याची भावना कार्यकत्र्यानी बैठकीत मांडली.
कार्यकत्र्यामुळे मी आहे. कार्यकत्र्यापेक्षा मी मोठा नाही. कार्यकत्र्याची वेदना ती आमची वेदना. तीच माझी भूमिका आहे. खरोखरच सापत्नभावाची वागणूक आणि दुजाभाव होत असेल तर कार्यकत्र्याचा अपमान गिळून गप्प बसणार नाही. लवकरच तालुकानिहाय कार्यकत्र्याच्या बैठका आयोजित करून त्यांच्या भावनांचा आदर राखला जाईल, असा निर्णय घेईन, अशा शब्दांत खासदार उदयनराजेंनी कार्यकत्र्याना दिलासा दिल्याचे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)