मुंबई : खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सातारा राष्ट्रवादी काँग्रेसमधील विविध गट एकवटल्याचे चित्र सध्या आहे. या पार्श्वभूमीवर आपलेही अन्य पक्षात मित्र असल्याचा उदयनराजेंचा इशारा खरा ठरतोय. रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानचे नितेश राणे यांनी आपापल्या पक्षाकडून निवडणूक लढविण्याची आॅफर उदयनराजे भोसले यांना दिली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. त्यातच सर्वपक्षीय मित्रांबाबत इशाऱ्यानंतर उदयनराजेंना विविध आॅफरही मिळू लागल्या आहेत. उदयनराजेंचा मित्रत्वाचा दिलेला इशारा लक्षात घेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांनी उदयनराजेंना आॅफर दिली आहे.‘उदयनराजे आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांचेही स्वागत आहे!’ असे टिष्ट्वट आमदार नितेश राणे यांनी केले आहे. त्यांच्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनीही उदयनराजेंना आॅफर देत आरपीआयच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचे आवाहन केले आहे.पार्थ नव्हे, फक्त मीच लढणार - सुप्रिया सुळेआमच्या घरातून स्वत: शरद पवार अथवा पार्थ नव्हे, तर फक्त मीच लोकसभा निवडणूक लढविणार आहे, असे खा. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. पार्थच्या उमेदवारीबाबत घरात अथवा पक्षात चर्चा झालेली नाही. हा विषय फक्त माध्यमांत आहे. भविष्यात काय होईल, हे आता सांगता येणार नाही, असे सूचक वक्तव्यही खा. सुळे यांनी केले.उदयनराजेंच्या उमेदवारीला होत असलेल्या विरोधावर त्या म्हणाल्या, उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पक्षात अजून चर्चा सुरू आहे. अद्याप निर्णय झालेला नाही.
उदयनराजेंना लोकसभेसाठी रिपाइं, स्वाभिमानची आॅफर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 1:55 AM