सातारा : ‘खंडणी व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. दरम्यान, या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहे, अशी माहिती अॅड. दत्ता बनकर यांनी दिली.लोणंदमधील सोना अलाईज कंपनीचे मालक राजीव जैन यांना १८ फेब्रुवारीला उदयनराजे यांनी येथील सर्किट हाउसवर बैठकीसाठी बोलावले होते. ‘कंपनीतील कामगारांचे काय झाले?’ असे विचारून उदयनराजे यांनी मारहाण केली. त्यानंतर उदयनराजे यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप जैन यांनी केला होता. शहर पोलीस ठाण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १५ जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. तर तीन जण अद्याप फरार आहेत. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून, पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य!- खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहे. सकृतदर्शनी फिर्यादीला मारहाण केल्याचा पोलिसांकडे पुरावा आहे. मात्र, तपास अर्धवट आहे. तसेच खंडणी स्वरूपात २४ लाख घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या कथित रकमेची रिकव्हरीही व्हायची आहे.- सर्किट हाउसवर असणाऱ्या सीसीटीव्ही फूटेजमध्येही फिर्यादी आणि संशयित येताना आणि जाताना दिसत आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाने युक्तिवादामध्ये केली.
उदयनराजेंचा जामीन फेटाळला
By admin | Published: April 12, 2017 1:14 AM