'त्या' मुख्यमंत्र्यांना फाईलवर सही करण्यासाठी पेन दिला, पण त्यांनी तो खिशात टाकला; उदयनराजेंनी सांगितला भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:03 PM2019-09-15T23:03:31+5:302019-09-15T23:07:03+5:30
उदयराजे यांचा नाव न घेता माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
सातारा: सत्तेत असतानाही कामं होत नाहीत. मात्र विरोधी पक्षाचा खासदार असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कामं मार्गी लावली, अशा शब्दांमध्ये भाजपामध्ये दाखल झालेल्या उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली. साताऱ्यातल्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करुन दाखवलं, असं टीकास्त्र उदयनराजेंनी सोडलं. भाजपात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच ते जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी अडकलेल्या फाईल आणि पेनाचा किस्सा उपस्थितांना सांगितला.
मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात आली. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी भाषण केलं. उदयनराजे यांनी त्यांच्या भाषणातून काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. सत्तेत असतानाही अनेकदा कामं मार्गी लागत नव्हती. बऱ्याचदा भांडून कामं करुन घ्यावी लागायची. कित्येकदा मी पाठवलेल्या फाईल्स केराच्या टोपलीत टाकण्यात आल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सुंदोपसुंदीचा, कुरघोडीचा फटका कायम जनहिताच्या कामांना बसला, असं उदयनराजे म्हणाले.
मला साताऱ्यात आयआयटी, आयआयएमसारख्या संस्था आणायच्या होत्या. पुण्याप्रमाणे साताऱ्यालादेखील शिक्षणाचं माहेरघर करण्याचं स्वप्न होतं. पण तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी मला जिल्ह्यात जागा नसल्याचं कारण दिलं. त्यानंतर मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटलो. जिल्ह्यात कुठे कुठे सरकारी जागा आहेत त्याचा शोध घेतला. त्यानंतर जागांची यादी मुख्यमंत्र्यांना दिली. नऊ वेळा त्यांची भेट घेतली. पण काहीच झालं नाही, असा अनुभव उदयनराजे यांनी सांगितला.
मला वाटलं मुख्यमंत्र्यांच्या पेनातली शाई संपली असावी. त्यामुळे ते स्वाक्षरी करत नसावेत. त्यामुळे मी एक चांगलं पेन घेतलं आणि त्यांच्या भेटीला गेलो. तुमच्या पेनातली शाई संपली असावी म्हणून कदाचित स्वाक्षरी करत नसाल. म्हणून हे नवीन पेन आणलं असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यावर त्याची काही गरज नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पेन खिशात टाकलं. पण स्वाक्षरी काही केली नाही, असा किस्सा उदयनराजे यांनी सांगितला. मी काय त्या मुख्यमंत्र्यांइतका शिकलेला नव्हतो, असंदेखील ते पुढे म्हणाले. यानंतर उदयनराजे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा सभास्थळी सुरू झाली.