सातारा -मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. जरांगे पाटील यांनी आज साताऱ्यात पोहोचल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीनंतर जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती उदयनराजेंनी माध्यमांसमोर दिली आहे. "मी मनोजला एवढंच सांगितलं की, तुझं कुटुंब आहे, त्यांना तुझी गरज आहे. त्यामुळे तू जगला पाहिजे," असं उदयनराजे म्हणाले.
आरक्षण प्रश्नावर आपली भूमिका मांडताना उदयनराजे पुढे म्हणाले की, "शिवाजी महाराजांनी आपल्या राजवटीत कोणावरही अन्याय केला नाही. आज एक व्यक्ती एवढं जे काही करतोय, ते कशामुळे करतोय? कारण त्यांच्यावर अन्याय झाला आहे. मी कोणत्या एका जातीचं समर्थन करत नाही. पण आज मनोज जरांगे मरायला तयार आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि त्यानंतर सर्वांना आरक्षण देण्यात यावं. मी मराठा समाजाचा म्हणून बोलत नाही, पण आज मेरिटवर आरक्षण दिलं पाहिजे, अशी सगळ्यांचीच मानसिकता झाली आहे. आज एखादा मुलगा शाळा, कॉलेजला जातो, तेव्हा तिथं आरक्षणाचा विषय निघतो. जातीजातींमध्ये तेढ कोणी निर्माण केली? हे तुम्ही शोधा. मला कोणावरही आरोप करायचे नाहीत. जे झालं ते चुकीचं झालं," अशा शब्दांत उदयनराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"तुम्ही प्रश्न सोडवणार नसाल तर माणसाने जगायचं कसं? नाहीतर विष पिऊन मेलेलं बरं अशी मानसिकता तयार होते. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, त्यामुळे या प्रश्नाचा राज्यकर्त्यांनी विचार करायला हवा," अशा शब्दांत उदयनराजेंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
ओबीसी मेळाव्यातील इशाऱ्यावर काय म्हणाले उदयनराजे?
तुम्ही एक छगन भुजबळ निवडणुकीत पराभूत करणार असाल, तर आम्ही तुमचे १५० आमदार पाडू, असा इशारा काल झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून देण्यात आला होता. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उदयनराजे म्हणाले की, "पाडायचे असतील तर पाडा आमदार. अजून काय बोलू? मीच उभा राहत नाही निवडणुकीत आता. सगळ्यांना माझं मनापासून एकच सांगणं आहे की, जरा विचार करा आणि देशाचे तुकडे करू नका."
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्य शासनाने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करुन आरक्षण देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले. पण, आरक्षणासाठी त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत शासनाला मुदत दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी राज्यभर दौरा सुरू केला आहे. शनिवारी ते सातारा शहरातील सभेसाठी आले होते. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा समाजबांधवांच्या साखळी उपोषणाला भेट दिली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार त्यांना घालण्यात आला. उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर आयोजकांनी सातारा जिल्ह्यातील आंदोलनाची माहिती जरांगे-पाटील यांना दिली. यावेळी समाजबांधवांनी ‘जय भवानी, जय शिवाजी... एक मराठा, लाख मराठा...' अशी जोरदार घोषणाबाजी केली.