मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत दिले आहे. येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडल्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर भाजपात जाणार की शिवसेनेत जाणार, याबाबत चर्चा सुरु आहे.
रामराजे नाईक-निंबाळकर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील राजघराण्याशी संबंधित आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फलटणच्या विकासाठी पक्षाच्या बाहेर जाऊन निर्णय घ्यावा लागेला तरी चालेल, असे सांगत राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिले आहे. याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येण्यात येईल, असेही यावेळी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले आहे.
याचबरोबर, साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे रामराजे नाईक-निंबाळकर यांना उदयनराजेंची कॉलर उडविण्याची स्टॉईल आणि चित्रपटातील डॉयलॉग मारण्याची स्टाईल छत्रपती घराण्याला शोभा देणारी आहे का, असा सवाल करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, "उदयनराजेंना आवडते आणि त्यांनी केलेले लोकांना आवडते, तर याला कोण काही करु शकणार नाही. त्यामुळे लोकांनीच त्यांना सांगितले पाहिजे की, शोभतय की नाही? लोकांना शोभत असेल तर त्यांनी आवश्य कॉलर उडवावी."
याशिवाय, रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, छत्रपती शिवेंद्रराजे माझे सहकारी होते आणि आजही आहेत. ते जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत. विकासात प्रवीण आहे. त्यांना थोडी संस्कृती आहे. हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे छत्रपती उदयनराजेंना मी काही बोलू इच्छित नाही, कारण मी बोललो की त्याला एक वेगळी छटा येते. निवडणुकीच्या काळात मी काही त्यांच्याबाबत बोलू इच्छित नाही, असे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.