Udayanraje News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहे. राज्यात महायुतीच्या वतीने ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले होते. यातील एका सभेत बोलताना उदयनराजे यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुती एकत्र आल्याचे म्हटले आहे.
सभेला संबोधित करताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो सर्व धर्मसभाव एकत्रित करून सर्वांना न्याय दिला होता, त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वधर्म समभाव एकत्र करून राज्यकारभार करत आहेत. ते सर्वांशी समन्वय आणि संवाद साधत असल्याने देश मोठ्या उंचीवर पोहोचला आहे. पंतप्रधान मोदींकडे भारत आणि जग मोठ्या आशेने पाहत आहे. आम्ही सर्व महायुतीचे घटक पक्ष स्वार्थासाठी एकत्र आलो नसून विकासाच्या मुद्द्यावरच एकत्र आलो आहोत. राज्यातील सर्व ४८ जागा या महायुती जिंकेल, असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला.
ओबीसी व मराठा वाद टाळायला हवेत
राज्यात सुरू असणारे ओबीसी व मराठा वाद टाळायला हवेत. इतर राज्याने आरक्षणात जशी वाढ करून सर्वांना न्याय दिला तसेच महाराष्ट्र शासनाने आरक्षणात वाढ करून मराठा समाजालाही आरक्षण द्यावे, असे उदयनराजे यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत हेच उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाची चौफेर घोडदौड सुरू आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राला आणि मुंबईला विकासाच्या बाबतीत वेगळ्या उंची उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम या दोघांनी व देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केले आहे. शेती औद्योगिक विकास सर्वसामान्यांचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे व शेतीच्या पाण्याचे प्रश्न हे अतिशय गांभीर्यपूर्वक नेतृत्वाने सोडवले, असे शंभुराज देसाई यांनी नमूद केले.