मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सर्व मतदारसंघांतील इच्छुकांची चाचपणी सुरु झाली आहे. मुंबईत आज मतदारसंघनिहाय बैठक सुरु असून साताऱ्यातून उमेदवारी मिळविण्यासाठी खासदार उदयनराजे इच्छुक आहेत, असे उदयनराजेंनीच जाहीर केले. मात्र, बैठकीमध्ये एका गटाचा याला विरोध झाला आहे.
राष्ट्रवादीची उमेदवार चाचपणीची आढावा बैठक मुंबईत सुरु होती. मात्र, उदयनराजेंना राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा पत्ताच माहीती नव्हता. शेवटी त्यांना फोनवरून मार्ग सांगण्यात आला. अखेर बैठक संपल्यानंतर उदयनराजे कार्यालयात पोहोचले.
दरम्यान, उदयनराजेंना पुन्हा साताऱ्याची उमेदवारी देण्यास बैठकीमध्ये एका गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला. उदयनराजें ऐवजी रामराजे निंबाळकर यांना खासदारकीचे तिकिट द्यावे, असा या गटाचा सूर होता. साताऱ्यातील वर्चस्वावरून राजघराण्यांमधील वाद सर्वश्रूत आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या निरिक्षकांनी सावध भुमिका घेतल्याचे समजते.
बैठक संपल्यानंतर पोहोचलेल्या उदयनराजेंनी आपण सातारा लोकसभेच्या उमेदवारसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. तसेच पवार साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचेही सांगताना विरोध करणाऱ्यांची ताकद किती याचाही विचार व्हावा, अन्यथा विरोध झाला तरीही जिंकून येण्याची ताकद असल्याचा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे. तसेच माझे सगळ्याच पक्षात मित्र आहेत, असाही इशारा त्यांनी दिला.
माझे लीड तोडणाऱ्यालाच संधी द्या.....
तसेच रामराजेना उमेदवारी देण्याच्या मागणीवरून उदयनराजेंनी राजकीय इच्छा असणे गैर नसल्याचे सांगितले. तसेच आताचे आमदार आणि खासदार हे माझे आधीपासूनचे मित्र आहेत. ते दुसऱ्या पक्षात गेले तरी चांगले मित्र आहेतच. गेल्या वेळचे मताधिक्य पाहिलं तर सर्वात जास्त मतं मला मिळाली होती. तेवढी मतं मिळवणारा उमेदवार असेल तरच त्याला संधी द्या, असेही उदयनराजेंनी प्रसारमाध्यमांना आज सांगितले. आपण पवार साहेबांचे आशिर्वाद घेतल्याचे सांगत अधिक तपशील देण्यास नकार दिला.