-संतोष मिठारी- कोल्हापूर : परीक्षेसाठी इंदोरला गेला असताना अचानक एका घराजवळील उच्च विद्युतदाबाच्या वाहिनीचा धक्का बसून उदयपूरच्या मनीषसिंह प्रवीणसिंह चौहानचा उजवा हात निकामी झाला. या अपघातात त्याच्या हाताचा काही भाग कापावा लागल्याने त्याला काहीसे दिव्यांगत्व आले. अशा परिस्थितीवर मात करून त्याने कबड्डीमध्ये चमकदार कामगिरी करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजस्थानच्या भूपाल नोबेल्स युनिव्हर्सिटीच्या संघातून तो खेळत आहे.
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेनिमित्त शिवाजी विद्यापीठात आलेला २१ वर्षीय मनीषसिंह चौहान हा अन्य संघातील खेळाडू आणि प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. उदयपूर (राजस्थान) हे मनीषसिंह याचे मूळ गाव. त्याचे वडील टेलरिंगचा व्यवसाय करतात, तर आई रेखा गृहिणी आहेत. सहा वर्षांपासून परीक्षा देण्यासाठी इंदोरमध्ये गेलेल्या मनीषसिंह याला विद्युतवाहिनीचा धक्का बसला. त्यात त्याचा उजव्या हाताचा काही भाग जळाला. त्याच्यावर तीन महिने रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातून बरे होण्यास त्याला दोन वर्षे लागली. त्याला कबड्डीची आवड होती.
उजवा हात निकामी झाला, तरी आपण कबड्डी खेळायची, असा निर्धार त्याने केला. त्यानुसार शरीरसौष्ठव आणि कबड्डीची तयारी त्याने सुरू केली. या तयारीच्या जोरावर शरीरसौष्ठवातील त्याने ‘मिस्टर राजस्थान’ हा किताब पटकविला. गेल्या तीन वर्षांपासून तो कबड्डी खेळत असून राज्य, पश्चिम विभागीय स्पर्धांमध्ये त्याने चमकदार कामगिरी करून वेगळी ओळख निर्माण केली. सध्या बी. ए. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. त्याची प्रो-राजस्थान कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याची जिद्द, कामगिरी प्रेरणादायी ठरणारी आहे.कधी हार मानायची नाहीअपघात झाल्यानंतर माझे कुटुंबीय, मित्रपरिवाराने मला पाठबळ दिले. कितीही संकटे, अडचणी आल्या, तरी आयुष्यात कधी हार मानायची नाही, असा निर्धार करून कबड्डीची तयारी सुरू केली. त्याच्या जोरावर यशस्वी ठरल्याचे मनीषसिंह याने सांगितले. दिव्यांग विद्यार्थी कुठेही कमी पडत नाहीत. त्यांना पाठबळ मिळणे आवश्यक आहे. आयुष्यात पुढे कबड्डीतच करिअर करणार असल्याने त्याने सांगितले.‘आॅलराउंडर’ अशी ओळखदिव्यांग असूनही प्रतिस्पर्धी संघाविरोधात लढताना सामन्यात चढाई, पकडी करताना मनीषसिंह कुठेही कमी पडत नाही. संघातील ‘आॅलराउंडर खेळाडू’ अशी त्याची ओळख आहे.