मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी शोले सिनेमातील असरानीशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, ‘केंद्रात निजामाच्या बापाचे सरकार बसले आहे’ अशी टीका केली होती. तोच धागा पकडून भाजपाच्या, ‘मनोगत’ या पाक्षिकात लिहिलेल्या लेखात भंडारी यांनी म्हटले आहे की, शोलेमध्ये जेलर असलेले असरानी आपल्या पोलीस शिपायांना, ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ,’ असा हुकूम सोडतात. असरानीच्या मागे एकही शिपाई उरत नाही.
निजामाच्या बापाशी तलाक घेतल्यास आपल्यामागे एकही आमदार राहणार नाही, अशी भीती शिवसेनेच्या कार्याध्यक्षांना वाटते का, असा बोचरा सवाल भंडारी यांनी या लेखात केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा समाचार घेताना भंडारी यांनी, ‘राऊत साहेब! तलाक कधी घेताय? या शीर्षकाखाली लेख लिहिला आहे. महाभारतातील संजय आपल्या दिव्यदृष्टीने कुरुक्षेत्रावरील युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला ऐकवत असे.
मात्र, या संजयाला मराठवाड्यात निजामाच्या बापाने केलेली विकासकामे दिसू नयेत आणि ती आपल्या कार्याध्यक्षांना सांगता येऊ नयेत हा दोष कोणाचा, असा सवालही माधव भंडारी यांनी केला आहे. निजामाच्या बापाच्या बिर्याणीवर ताव मारायचा आणि यजमानाच्या नावानं बोटं मोडायची ही कुठली ‘सच्चाई’ अशी बोचरी टीकाही लेखात आहे. शिवसेनेने खुशाल युती तोडावी, असे आव्हानदेखील त्यांनी दिले आहे. या दोन पक्षांतील वाक्युद्धामुळे नेत्यांमधील व्यक्तिगत संबंधही विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. (विशेष प्रतिनिधी)संघ, भाजपा हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून भरकटलीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा दोघेही हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून भरकटले असून, मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी संघाने इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे, अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केली आहे.रा. स्व. संघाच्या मुस्लीम राष्ट्रीय मंचाने २ जुलै रोजी इफ्तारचे आयोजन केले आहे. त्यावर जोरदार हल्ला चढवत कायंदे म्हणाल्या, संघाने इफ्तारचे आयोजन केल्याबद्दल आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. कारण, त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा कधीच सोडून दिला असून, मतांच्या राजकारणासाठी ते असल्या पार्ट्या आयोजित करीत आहेत.आजवर काँग्रेसवर मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा आरोप करणारी भाजपा आणि संघवाले आता स्वत:ही तेच करत आहेत, असा टोलाही कायंदे यांनी लगावला.