अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची सभा झाली. यावेळी शाह यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. शरद पवारांनीही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, असे शाह यांनी म्हटले.
उमेश कोल्हे यांची हत्या झाली आणि या तथाकथित 'हिंदू रक्षक' उद्धव ठाकरेंनी काहीही केले नाही. 'उद्धवबाबू', तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले आहेत. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे सर्व संस्कार घेऊन पुढे जात आहेत. आता आमचे सरकार आहे, ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे आणि आता उमेशची हत्या होणार नाही, अशी हिम्मत कोणाची होणार नाही, असे शाह म्हणाले.
हे स्वत:ला शिवसेनेचे अध्यक्ष मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. पण, हे नकली शिवसेनेचे अध्यक्ष सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत, अशी टीका शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी अमित शाह यांनी खासदार शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण शरद पवार यांनाही दिले होते, पण त्यांनी तब्येतीचे कारण सांगत आले नाहीत. पण आता शरद पवार निवडणुकीच्या प्रचारात फिरत आहेत, असंही अमित शाह म्हणाले. तुम्ही 10 वर्ष कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले. विदर्भात शेतकऱ्यांनी तुमच्या कार्यकाळात आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांची माफी मागा, अशी मागणी शाह यांनी केली.