महायुतीत खळबळ : भाजपा नेते अस्वस्थ
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा जाहीरपणो व्यक्त करत जागावाटपाबाबत आग्रही भूमिका घेताना कुणीही मर्यादाभंग करू नये, असा इशाराही एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे.
काल-परवार्पयत मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न केल्यावर टाळाटाळ करणा:या उद्धव यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा प्रकट केल्यामुळे भाजपामधील या पदाच्या किमान अर्धा डझन इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी आव्हान दिले आहे. भाजपाकडून सातत्याने सुरू असलेल्या अतिरिक्त जागांची मागणी बंद व्हावी याकरिताच ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची इच्छा प्रकट केल्याचे बोलले जात आहे. मात्र आता उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार, की विधान परिषदेचे मागील दार वाजवणार, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले तर त्याचे नेतृत्व शिवसेनेकडे असेल. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने आपल्याला पडत नाहीत. परंतु आपल्यावर या पदाची जबाबदारी पडली तर आपण पळ काढणार नाही. आपल्या कामाबद्दल तक्रार करण्याची संधी लोकांना मिळणार नाही, असे सांगून उद्धव यांनी आपल्या मनातील सुप्त आकांक्षा बोलून दाखवली. आपण दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असून कोणतीही जबाबदारी पार पाडण्यास कचरत नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. (विशेष प्रतिनिधी)
.तर उद्धव कुठून लढणार?
उद्धव यांनी निवडणूक लढवायचे ठरवले तर त्यांचे वास्तव्य असलेल्या वांद्रे (पू.) मतदारसंघातून, ठाण्यातील एखाद्या मतदारसंघातून किंवा आपली सासुरवाडी असलेल्या डोंबिवलीतून निवडणूक लढवू शकतील. अथवा थेट लोकांमधून निवडून न जाता विधान परिषदेचे सदस्यत्व स्वीकारतील.
परिणाम काय?
शिवसेना-भाजपा युतीत निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरविला जात नाही. ज्या पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे आजवरचे युतीचे सूत्र राहिले आहे. युतीची आता तर महायुती झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना विश्वासात न घेता उद्धव यांनी मुख्यमंत्री बनण्याचे संकेत दिल्याने महायुतीच्या जागावाटपात पेच निर्माण होऊ शकतो, असे बोलले जात आहे. शिवाय, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. त्यामुळे फडणवीस यांच्यासह भाजपातील इतर दावेदारांची उद्धव यांनी गोची केली आहे.