मुंबई : राज्यात आणि केंद्रात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना १३ फेब्रुवारीला होत असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या मुख्य उद््घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेले नाही. उलट १५ फेब्रुवारीला बीकेसीवर होणाऱ्या ‘मेक इन मुंबई’ या विषयावरील चर्चासत्राचा समारोप उद्धव यांच्या हस्ते करून त्यांना मुंबईपुरते सीमित ठेवण्यात आले की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. मात्र या समारंभात उद्धव यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित न करून उभयतांना एका व्यासपीठावर आणण्याचे टाळले गेले आहे. राज्याचे उद्योग खाते शिवसेनेकडे असताना हे घडले.मात्र, ‘मेक इन मुंबई’ या विषयावरील चर्चासत्राचा समारोप आणि १४ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता गिरगाव चौपाटीवर आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ या कार्यक्रमास त्यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना या तीन कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले, ते आमंत्रण त्यांनी स्वीकारले. भाजपाकडून शिवसेनेची उपेक्षा होत असल्याची तक्रार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत केली होती. त्या वेळी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचा उचित सन्मान केला जाईल, असे आश्वासन दिले होते. सरकारी कार्यक्रमात उद्धव यांना बोलावले असता प्रोटोकॉलचा प्रश्न उपस्थित झाला असता. तो सोडवण्यासाठी ते तीन कार्यक्रमांना उपस्थित राहतील. ते या कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याच्या वृत्ताला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दुजोरा दिला. (विशेष प्रतिनिधी)सरकारी कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलचा प्रश्नभाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, १३ तारखेचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा सरकारी आहे. त्यात प्रोटोकॉल सांभाळणे आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना व्यासपीठावर बसविता येत नव्हते आणि खाली श्रोत्यांमध्ये त्यांना बसविणे योग्य दिसले नसते.
उद्धव उरले मुंबईपुरतेच !
By admin | Published: February 12, 2016 3:21 AM