मुंबईत उद्धवसेना मोठा भाऊ, काँग्रेसला दुसरे स्थान; ३६ पैकी ३३ जागांवर एकमत; तिढा कोणत्या जागांचा?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 02:21 PM2024-10-17T14:21:47+5:302024-10-17T14:23:22+5:30
मुंबईत महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना हाच मोठा भाऊ असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महेश पवार -
मुंबई : मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी ३३ जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. यामध्ये उद्धवसेनेच्या वाट्याला काँग्रेस, शरद पवार गटापेक्षा जास्त जागा येतील. ३ जागांचा तिढा २-३ दिवसांमध्ये सोडविला जाईल. महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर करण्यात येईल. मुंबईत महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना हाच मोठा भाऊ असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांपैकी युतीमधील शिवसेनेने १९ तर भाजपने १७ जागा लढविल्या होत्या. यातील फक्त मालाड मतदारसंघात भाजप उमेदवार पराभूत झाला. तर, शिवसेनेला मानखुर्द, अणुशक्ती नगर, वांद्रे - पूर्व, धारावी आणि मुंबादेवी अशा पाच ठिकाणी हार पत्करावी लागली होती. आघाडीतील काँग्रेसने २९, राष्ट्रवादी काँग्रेसने ६ आणि समाजवादी पक्षाने १ अशा जागा लढविल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसला ४, राष्ट्रवादीला १ आणि सपाला १ जागेवर यश मिळाले होते. महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने यावेळी १९ जागांवर आपला दावा सांगितला आहे. तर, गेल्यावेळी २९ जागा लढविणाऱ्या काँग्रेसने आता १४ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला २ तर समाजवादी पक्षाला १ जागा देण्यात येणार आहे. मात्र, ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
संभाव्य जागा -
उद्धवसेना
दहिसर, मागाठाणे, विक्रोळी, भांडुप, जोगेश्वरी, दिंडोशी, अंधेरी (पूर्व), गोरेगाव, कुर्ला, कालीना, वांद्रे पूर्व, माहीम, वडाळा, वरळी, शिवडी, मुंबादेवी.
काँग्रेस
बोरिवली, मुलुंड, कांदिवली, चारकोप, मालाड (पश्चिम), अंधेरी (पश्चिम), विलेपार्ले, घाटकोपर (पूर्व), चेंबूर, वांद्रे (पश्चिम), धारावी, सायन कोळीवाडा, मलबार हिल, कुलाबा.
शरद पवार गट
वर्सोवा, अणुशक्ती नगर
समाजवादी पक्ष संभाव्य जागा
मानखुर्द/शिवाजीनगर
कोणत्या जागांचा तिढा?
भायखळा, चांदिवली, घाटकोपर (पश्चिम)