शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिलेल्या 17 लोकसभा उमेदवारांच्या नावाच्या घोषणा आज सकाळी करण्यात आली. काही जागा काँग्रेसने दावा केलेल्या आहेत. यावर राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या जाहीर जागांवर तिढा असेल असे वाटत नाही, असे म्हटले आहे. एकूण 22 जागा शिवसेना लढत आहे. उरलेली 5 नावे येत्या दोन दिवसांत जाहीर केली जातील, असे राऊत म्हणाले.
हातकणंगलेमध्ये स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे. रामटेकला आमचे खासदार चार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडून आले आहेत. शिवसेना मोठा पक्ष आहे, कोल्हापूर आमच्या हक्काची जागा आहे. तिथे आम्ही तीस वर्षे जागा लढत आहोत. यावेळी ती सिटिंग जागा होती. छत्रपती शाहू महाराजांचे नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढत असल्याचे समजल्यावर आम्ही ती जागा सोडली, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आहोत. आम्ही त्यांना काल पाच जागांचा प्रस्ताव दिला आहे. अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकरांनी आमच्याबरोबर असावे, असे आम्हाला वाटत आहे, असे राऊत म्हणाले.
औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांचे नाव जाहीर झाल्यावरून अंबादास दानवे नाराज असतील असे नाही. लढण्यासाठी इच्छा व्यक्त करणे हा अपराध नाही. परंतु उमेदवारी ही एकालाच द्यावी लागते. जळगाव, पालघर, कल्याण-डोंबिवली, मुंबई उत्तर या जागांची चर्चा पूर्ण झाली आहे उद्या पर्यंत नावे जाहीर करू, असे राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्याबाबत मी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. दिल्लीचा एकंदरीत कारभार औरंगजेबी पद्धतीचा आहे. याला आक्षेप घेण्यासारखे काय आहे. त्याला हुकूमशाही बोलतात. हिटलरचा कारभार म्हणतात, आम्ही महाराष्ट्रात आहोत म्हणून आम्ही औरंगजेबाचा कारभार बोलतो, असे प्रत्यूत्तर राऊत यांनी भाजपाला दिले आहे.