मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वादात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे (ShivSena) धनुष्यबाण चिन्ह गोठवले. चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक कठीण होऊ शकते.
दरम्यान, कितीही प्रयत्न केले तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हा ब्रँड पुसू शकत नाही किंवा खोक्याने विकत घेता येणार नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), भाई जगताप आणि अमित देशमुख यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
या भेटीनंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी विनायक राऊत म्हणाले, नाना पटोले, भाई जगताप आणि अमित देशमुख यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी अंधेरी पोटनिवडणूकीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला असल्याचे सांगितले. तसेच, समोरच्या माणसांनी कितीही प्रयत्न केले तरी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा ब्रँड पुसू शकत नाही किंवा खोक्याने विकत घेता येणार नाही, असे विनायक राऊत म्हणाले. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु असून न्यायाचा विजय होईल, अशी अपेक्षा असल्याचेही विनायक राऊत म्हणाले.
दुसरीकडे, अंधेरी पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार आहे. सोनिया गांधी यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. ही जागा काँग्रेसची आहे, पण सहकार्य करू असा निर्णय आम्ही घेतला आहे. मित्र अडचणीत आला तर त्याला मदत करणे हाच आमचा धर्म आहे. काँग्रेस पूर्ण ताकदीने शिवसेना उमेदवाराचा प्रचार करेल,' असे नाना पटोले म्हणाले.