Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis BJP: "मी वापरलेल्या कलंक या शब्दात इतकं जिव्हारी लागण्यासारखं काय आहे? तुम्ही जेव्हा एखाद्या माणसावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असता तेव्हा तुम्ही त्यांच्यावर हा कलंक लावत नसता का? एखाद्या माणसाच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप करणं म्हणजे त्यांच्यावर कलंक लावण्यासारखंच आहे. मी भाषणातून बोललो आहे. माझा कलंक हा शब्द त्यांना एवढा जिव्हारी लागेल असं मला वाटलं नव्हतं. पण आता त्यावरून जे घडतंय ते पाहता, किमान त्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवून दुसऱ्यांवर आरोप करताना याचं भान ठेवा," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कलंक शब्दांवरून झालेल्या राड्यावर स्पष्टीकरण दिले.
"तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हा कुठल्या प्रकारचा न्याय आहे. तुम्ही ज्या प्रमाणे एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून कलंकित करत आहात आणि नंतर त्यांना मंत्रिमंडळात घेता. अशा वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी कसं वागायचं? कलंक शब्दावरून एवढे आक्रमक होण्याचे कारण काय? कारण सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेला कारभार हा महाराष्ट्रासाठी एक कलंकच आहे. तो लावणं त्यांनी थांबवावं. भाजपच्या सरकारनं लोकांच्या दारी जावं, पण घरातल्या लोकांचा तळतळाट घेऊन येऊ नये."
एकनाथ शिंदे यांनाही सुनावलं
'मी मुख्यमंत्री होऊन राज्यभर फिरायला लागलो त्यामुळे अनेकांचे गळ्याचे आणि कमरेचे पट्टे सुटले आणि ते लोकही दौरे करू लागले," असा उल्लेख एकनाथ शिंदे यांनी एका भाषणात केला होता. त्यावरून ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं. "भाजपाने माझ्यावर अनेक आरोप केले आहेत. पण मी त्यांना दाखवून दिलं की कलंक काय असतो त्यामुळे ते इतके आक्रमक झाले आहेत. माझ्या ऑपरेशनवर आणि शारिरीक बाबतीत त्या लोकांनीही टीका केली आहे. माझी चेष्टा केली आहे. काहींच्या कमरेचा पट्टा सुटला, काहींच्या गळ्याचा पट्टा सुटला, असं काही लोक म्हणतात. त्या लोकांना हे भोगावं लागू नये, पण जेव्हा ते भोगतील तेव्हाच त्यांना त्यातील वेदना समजेल. तुम्ही एखाद्याला तब्येतीवरून किंवा कुटुंबावरून बोलता, खालची पातळी गाठता. त्यामुळे माझं ठाम मत आहे की हे लोक कलंक आहेतच", असेही ठाकरे म्हणाले.