लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहावर बंदद्वार चर्चा झाल्याने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वादग्रस्त विधान आणि त्यानंतर राणे यांना झालेली अटक या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला माजी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृहावर ज्या सभागृहात मंत्रिमंडळाची बैठक होते, त्याच ठिकाणी ही बैठक झाली. या सभागृहाच्या बाजूला मुख्यमंत्र्यांचा एक कक्ष आहे.
बैठकीनंतर मुख्यमंत्री व फडणवीस सोबतच त्या कक्षात गेले. याचा अर्थ ओबीसी बैठकीनंतर बंदद्वार चर्चा करायची हे दोघांमध्ये आधीच ठरले होते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे ही चर्चा न ठरविता अचानक झाली नाही, हे स्पष्ट होते. उभयतांमध्ये जवळपास दहा ते बारा मिनिटे ही चर्चा झाली. त्या वेळी आधीच्या बैठकीला उपस्थित असलेल्यांपैकी तीन-चार मंत्री कक्षाबाहेरच थांबले होते.
‘ही’ भेट आणि ‘ती’ भेट...फडणवीस यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी वीस मिनिटे बंदद्वार चर्चा केली होती. मुख्यमंत्री व महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्यपालांनी भेट नाकारली; पण फडणवीस यांना त्यांनी वेळ दिला, अशी चर्चा गुरुवारी रंगली होती. त्यानंतर लगेच शुक्रवारी ठाकरे-फडणवीस चर्चेने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण न आले, तरच नवल.
राणे यांचा हल्लाबोल सुरूचनारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी काढलेल्या अनुद्गारानंतर तणाव निर्माण झाला. शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये वाक्युद्धही रंगले. राणेंना अटक होऊन जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारपासून पुन्हा सुरू झाली. मात्र, राणे यांनी आधीप्रमाणेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे-फडणवीस यांच्यातील बंदद्वार चर्चेला महत्त्व आले आहे.मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्ली दौऱ्यात तासभर चर्चा केली होती. तेव्हाही राजकीय चर्चांना उधाण आले होते.
राणेंच्या टीकेची धार कमी होईल?काही दिवस अगोदर झालेली अटक व सुटकेनंतर नारायण राणे शिवसेनेवरील शाब्दिक हल्ले कमी करतील, असे वाटत असताना त्यांनी अधिकच तीव्र आणि वैयक्तिक टीका चालविली आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात या विषयावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीनंतर नारायण राणे हे शिवसेना व ठाकरे परिवारावरील टीकेची धार कमी करतात का, याबाबत उत्सुकता असेल.