पंढरपूर - उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं. शिवसेना वाढवावी ही भावना प्रत्येक शिवसैनिकांची, पदाधिकारी आणि आमदार-खासदारांची आहे. भगवंताच्या आशीर्वादाने हे घडून येईल असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला आहे. कुठलीही निवडणूक लागल्यानंतर निकाल लागेपर्यंत सर्वच नेते आपापले विजयाचे दावे करतात. प्रत्येकजण विजयाचा दावा करतो. निकाल लागल्यावर वास्तव कळेल असा टोला सांगोल्याचे शिंदे गटाचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटलांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
शहाजी पाटील म्हणाले की, २-४ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार सुकर होईल आणि सरकार योग्य दिशेने काम करेल. राज्यपालांबाबत एखादं विधान करणे गैर आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्याला वेगळे महत्व असतं. बोलत असताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या आहेत. मुंबईबाबत त्यांचे विधान हे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला खटकणारं होतं. त्याबद्दल त्यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत जनतेचे प्रश्न सोडवणं आणि समस्येतून बाहेर काढण्यासाठी सर्व पक्षांनी एकजूटीने काम करणं गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच विधान भवनातील कुठल्याही खुर्च्या मोकळ्या नाहीत. अधिवेशन सुरू झालं नाही. २ लोकांचे सरकार चाललंय हा विरोधकांचा गैरसमज आहे. कुठल्याही सरकारचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागेल असा विश्वास आहे. तर धनुष्यबाण चिन्हाची लढाई कायद्याने सुप्रीम कोर्टात सुरू आहे. परंतु बहुमताचा विचार केला तर धनुष्यबाण आम्हालाच मिळेल असंही आमदार शहाजी पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करून केंद्राशी सुसंवाद ठेवत राज्याचा विकास करत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी आणत आहे. केंद्र आणि राज्य ही दोन्ही सरकार समान विचारांची आल्यामुळे येत्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा विकास वेगाने होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांना पुरक काम करत आहेत. त्यामुळे राज्याचा विकास होण्यास फायदेशीर ठरेल असं शहाजी पाटलांनी म्हटलं आहे.