परभणी - पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच आडीमध्ये 56 पक्ष एकत्र आले आहे. मात्र 56 पक्षच काय 56 पिढ्या जरी खाली उतरल्या तरी परभणीवरील भगवा खाली उतरणार नाही, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा आज परभणी येथे झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या शरद पवार यांच्या विधानांचा जोरदार समाचार घेतला. ''आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादीने शेण घोटाळा केला होता. पाच वर्षांपूर्वी यांनी केलेल्या घोटाळ्यांवर मी एक पुस्तकच प्रकाशित केले होते. लोकं विसरली असतील. पण या आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचे वर्णन करायला. बाराखडीही कमी पडेल,'' असे उद्धव ठाकरे म्हणाले. शरद पवार बोलतात की उद्धव ठाकरे वारा येईल तशी दिशा बदलतात. याच वाऱ्यामुळे माझा भगवा ध्वज डौलाने फडकत आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधींवरही उद्धव ठाकरे बरसले. ''राहुल गांधी सावरकरांना डरपोक बोलतात. म्हणून राहुल गांधींना सांगतोय की हा हिंदुस्तान आहे हा इटली नाही आहे. राहुल गांधी आयुष्यात कधी पंतप्रधान होणार नाही. काँग्रेस जर क्रांतिकारकांना देशद्रोही बोलतोय. अशा कपाळकरंटकाना हा देश देऊ नका, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. ''शेतकऱ्यांसाठीच्या जाचक अटी याचा पाठपुरावा करून त्या शिवसेनेने काढून टाकल्या आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. गेली पाच वर्षे माझा शिवसैनिक दुष्काळग्रस्तांना मदत करतोय आणि तेव्हा राष्ट्रवादीवाले घराच्या आत दरवाजा लावून बसले होते., असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला.
आघाडीच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, उद्धव ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 8:57 PM