Uddhav Thackeray PM Modi News : 'मोदीजी, तुम्ही कोणा-कोणाची माफी मागणार आहात. मग्रुरीने माफी मागून चालणार नाही', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. मालवणमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेच्या निषधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत महायुती सरकारच्या विरोधात जोडे मारा आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.
महाविकास आघाडीच्या 'जोडे मारा' आंदोलनाप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "चार दिवसांपूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली. अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला महाराष्ट्राने शिल्लक ठेवले असते का?", असे टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर डागले.
ठाकरे पुढे म्हणाले, "माफी मागताना सुद्धा त्यांच्या (मोदी) चेहऱ्यावरती जी एक मग्रुरी होती. मग्रुरी तुम्हाला (उपस्थित लोकांना) पसंत आहे का? माफी मागताना नतमस्तक, फक्त शब्दात नाही, पण मग्रुरीने माफी आम्हाला मान्य नाही."
एक शहाणा, दोन दीड शहाणे; शिंदे, फडणवीस, अजित पवारांवर टीका
"त्याचवेळी जे काही त्यांच्या व्यासपीठावर बसले होते, त्यामध्ये एक शहाणा, दोन दीड शहाणे... मला कल्पना नाही. पण, त्यातील एक हाफ तर हसत होता. म्हणजे तुम्ही महाराजांची इतकी थट्टा करता. पहिले म्हणजे मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली?, पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी मागितली?", असे सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केले.
"मोदीजी जेव्हा सिंधुदुर्गात आला, तेव्हा निवडणुकीसाठी आलात हे आम्हाला माहिती होते. आम्हाला अभिमान वाटला होता की, देशात पहिल्या प्रथम नौदल दिन महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर साजरा होतोय. दिमाखदार केला होता. पण, त्याचवेळी घाईघाईने भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची गरज नव्हती", असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोणा-कोणाची माफी मागणार? मोदींना ठाकरेंचे सवाल
"निवडणुकीच्या वेळी जेव्हा मोदी म्हणत होते की, ही मोदींची गॅरंटी आहे. हीच ती मोदी गॅरंटी. जिथे हात लावेल तिथ सत्यानाश होईल. माफी तुम्ही कोणा कोणाची मागणार? महाजांचा पुतळा भ्रष्टाचाराने कोसळला त्यासाठी मागणार? निवडणुकीसाठी म्हणून घाई गडबडीने राम मंदिर उभे केले, ते गळतेय म्हणून माफी मागणार? संसद भवन गळतेय म्हणून मागणार?", असे सवाल ठाकरेंनी मोदींना घेरले.
"दिल्लीच्या विमानतळाचे छत कोसळले, पूल कोसळताहेत, सगळ्यांबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसे... राष्ट्रपती म्हणाल्या आता बस्स झाले. महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही. शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या आत्म्याचा, महाराष्ट्र धर्माचा अपमान केला आहे. महाराष्ट्र शिवरायांचा अपमान करणाऱ्याला कधीही माफ करत नाही. करणार नाही", असा इशारा ठाकरेंनी मोदींना दिला.