परळी (जि. बीड) : मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष टिपेला पोहोचला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अचानक गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत.
उद्धव ठाकरे येणार असल्याने मंगळवारी सकाळपासूनच भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची गोपीनाथगडावर गर्दी झाली होती. गडाचे सेवक विठ्ठल दगडोबा मुंडे यांनी समयसूचकता दाखवत समाधीस्थळावर कमळ - धनुष्यबाणाची रांगोळी फुलातून साकारली होती. भाजप-सेना युतीला उजाळा मिळावा म्हणून फुलांची रांगोळी काढली, असे मुंडे यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे भाजप कोअर कमिटीच्या बैठकीसाठी मुंबईला गेल्याने त्या यावेळी उपस्थित नव्हत्या. त्यांच्या अनुपस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांनी उद्धव यांचे स्वागत केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. राष्टÑवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे निवडून आले. हा पराभव पंकजा यांच्या जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी गोपीनाथगडावर येऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे.