मुंबई – सध्या राज्यात ऑक्सिजनसहरेमडेसिवीर इंजेक्शनाबाबतही मोठ्या प्रमाणात मागणी होतेय. सगळ्यांना रेमडेसिवीर पाहिजे. आपल्याला सरासरी ५० हजार रेमडेसिवीरची आवश्यकता आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा केंद्राकडून होत आहे. २६, ७४८ रेमडेसिवीर केंद्राकडून मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली त्यानंतर ४३ हजार रेमडेसिवीर केंद्राकडून पाठवण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. परंतु रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर करू नका. गरजेपेक्षा जास्त रेमडेसिवीर दिल्यास त्याचे दुष्परिणाम नाकारता येत नाही. रुग्णाला रेमडेसिवीर द्यायचं की नाही हे डॉक्टरांना ठरवू द्या असा मोलाचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यातील जनतेला दिला आहे.
"१२ कोटी लसीचे डोस एकरकमी चेकने खरेदी करू, पण केंद्रानं लक्ष घालून लस पुरवठा करावा"
हवेतून ऑक्सिजन तयार करणे
हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रात बसविणे सुरु आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये हे प्लांट उभे राहतील. एका प्लांटमधून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो. मुंबई महापालिका १२ रुग्णालयांमध्ये १६ ऑक्सिजन प्लांट उभारत आहे. या सर्व १६ प्रकल्पांतून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होणार आहे. ३५ जिल्ह्यांतून ३०९ प्लांट्सपैकी २१ कार्यरत आहेत त्यातून २७ मेट्रिक टन पुरवठा सुरु आहे. २८० प्लांट प्रस्तावित आहेत लवकरच ३५१ मेट्रिक टन पुरवठा सुरु होईल. १९००० बेड्सना ऑक्सिजन देणे शक्य आहे.
"मी कुठेही कधीही राजकारण आणणार नाही, पण..."; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा
गॅस ऑक्सिजन जिथे तिथेच कोविड सेंटर
महाजेनकोच्या खापरखेडा, अकोला आणि परळी येथील केंद्रानजीक मोठ्या प्रमाणावर जम्बो सुविधा उभारण्यात येत असून त्याठिकाणी थेट रुग्णांना ऑक्सिजन मिळेल याची व्यवस्था करण्यात येत आहे. रिलायन्सच्या नागोठणे प्रकल्पाजवळ जम्बो केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. पेनमधील जेएसडब्ल्यू कंपनीच्या रुग्णालयात लवकरच जम्बो कोविड सेंटर सुरु होत आहे. लॉंयड स्टील, वर्धा परिसरात १००० बेड्सची जम्बो सुविधा उभारणार आहे. लिक्विड ऑक्सिजन ने आण करता येते. परंतु गॅस ऑक्सिजन वाहून नेता येत नाही. मग जिथे जिथे गॅस ऑक्सिजन आहेत त्याच्या शेजारी कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न आहे.
तिसरी लाट आली तरी महाराष्ट्र सक्षम
संपूर्ण जगात कोरोनाच्या लाटांमागून लाटा येत आहेत. आणखी किती लाट येणार कल्पना नाही. दुसरी लाट आपण अनुभवतोय. तिसरी लाट येणार नाही असं कोणी सांगू शकत नाही. त्यासाठी महाराष्ट्राने तयारी केली आहे. तिसरी लाट आली तरी त्याचे गंभीर आणि घातक परिणाम होणार नाही यासाठी महाराष्ट्र कंबर कसून तयार आहे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.