कोल्हापूर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रांगणात उभारण्यात येणारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य २२ फुटी पुतळा करवीर तालुक्यातील शिये येथे बनविण्यात येत आहे. हा पुतळा पाहिल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भावनाविवश झाले. पण काही क्षणातच स्वत:ला सावरत त्यांनी पुतळ्यामध्ये हवे असणारे बदल बारकाव्याने शिल्पकारांला सांगितले. शियेतील हनुमाननगरमधील शिल्पकार संताजी चौगले यांच्या शिल्पशाळेत हा पुतळा तयार होत आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या पुतळ््याचे काम पाहण्यासाठी उद्धव ठाकरे गुरुवारी खास विमानाने येथे आले होते. जवळपास पाच टन वजनाच्या या पुतळ्याच्या संपूर्ण भागाचा मोल्ड तयार केला असून चेहऱ्याचे मेणातील क्ले-मॉडेलही तयार करण्यात आले आहे. याचेच मोल्ड बनवण्यात येणार आहे. पुतळ््यामध्ये काहीही त्रुटी राहू नयेत, यासाठी डोळ््यात तेल घालून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा तयार करण्याची संधी मिळाली हे माझे मोठे भाग्य आहे. या पुतळ्यासाठी सुमारे पाच टन तांबे लागणार आहे. पुतळयाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील दोन महिन्यात हा पुतळा पूर्ण होईल, असे शिल्पकार संताजी चौगले यांनी सांगितले.
...आणि उध्दव ठाकरे भावनाविवश झाले!
By admin | Published: September 23, 2016 4:54 AM