नागपूर - महाविकास आघाडीमधील आम्ही घटकपक्ष एकदिलाने एकत्र आलो आहोत. त्यामुळे पुढची पाच वर्षेच नाही तर पुढील पाच पिढ्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत राहील, असा विश्वास मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आले आहेत. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या सत्कारानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सरकारच्या दीर्घकाळ चालण्याबाबत विश्वास व्यक्त केला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. या अधिवेशनासाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रिमंडळ नागपूरमध्ये दाखल झाले आहे. आज नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीकडून सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले, ते म्हणाले की, महाविकास आघाडीमधील आम्ही घटकपक्ष एकदिलाने एकत्र आलो आहोत. त्यामुळे पुढची पाच वर्षेच नाही तर पुढील पाच पिढ्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत राहील. आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला काहीही चिंता करण्याची गरज नाही.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशाला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे सरकार आणि शासन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार देईल, असे आश्वासनही दिले.
दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीचं सरकार हे स्थगिती सरकार आहे. अद्याप या सरकारने खातेवाटपही केलं नाही, त्यामुळे नेमके कुणाला प्रश्न विचारायचे असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच, शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार, सरसकट कर्जमाफी कधी होणार याचा किमान कार्यक्रम तरी जाहीर करावा, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. निवडणूक काळात या राजकीय पक्षांकडून जी सर्व आश्वासनेच होती, तीच आठवण आम्ही करून देत आहोत. सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडता कामा नये, हे सरकार स्थगिती सरकार असून महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाल्याचं दिसत आहे. सरकारच्या भूमिकेमुळे राज्यात असंतोष असून स्थगिती अशीच राहणार का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.