Uddhav Thackeray Devendra Fadnavis, Maharashtra Budget: शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहेत. या अधिवेशनता आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. शेती-शेतकरी, महिला व अल्पसंख्याक विकास, भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधांचा विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणपूरक विकास अशा ५ महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेकविध घोषणा करण्यात आल्या. तसेच काही नव्या योजनांचाही समावेश करण्यात आला. यावर महाविकास आघाडीतील शिवसेनेा उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दांत टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
"महाविकास आघाडीने आपल्या अर्थसंकल्पात जे मुद्दे मांडले होते, त्याच मुद्द्यांवर आजचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. आम्ही सत्तेत असताना केंद्रातील सरकार आमच्या बाजूचे नव्हते त्यामुळे केंद्राकडून येणारा GST ता निधी कायम थकबाकीत असायचा. नेहमी सरासरी २५ हजार कोटींच्यापेक्षा जास्तीची थकबाकी शिल्लक असायची. आता सरकारला सहा महिने झालेत. महाशक्तीचा पाठिंबा असलेले हे सरकार कसा कारभार करत आहे हे साऱ्यांनाच माहिती आहे. अवकाळी पावसाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर एकही माणूस पंचानामे करायला गेला नाही. अजूनही काही गोष्टी मला समजल्या आहेत. अवकाळी पावसाप्रमाणाचे आज मुंबईत गडगडाट झाला. पण गरजेल तो बरसेल का असा सध्याचा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे हा 'गाजर हलवा' अर्थसंकल्प आहे", अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर मत व्यक्त करत सरकारची खिल्ली उडवली.
"आम्ही मुंबई पालिकेसाठी आपला दवाखाना ही योजना सुरू केली होती. त्यावेळी या लोकांना फिती कापण्याचे भाग्य मिळत होते. तीच योजना आता राज्यभर राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांनाही मदत वाढवल्याची घोषणा केली आहे. पण शेतमालाला हमखास भाव मिळणं यावर विचार करायला हवा. भाजपा केंद्रात सत्तेत आलं तेव्हा शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुप्पट करू असं म्हणाले होते. तसं अजूनही झालेलं नाही. त्यामुळे नुसत्या घोषणा झाल्यात, पण यांची अंमलबजावणी कशी होणार आणि कधी होणार हे पाहावं लागले. म्हणूनच हा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा आहे," असे ठाकरे म्हणाले.